"मेरा भारत महान" युवा क्रिकेट लीग पुणे येथे खेळणार
*चिखली (नितीन फुलझाडे) -* चिखली शहरासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे येथे दि. 25 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या "मेरा भारत महान" युवा क्रिकेट लीग, महाराष्ट्रच्या निवड चाचणीत चिखली येथील KCA क्रिकेट अकॅडमीच्या चार होतकरू खेळाडूंची निवड झाली आहे.
येत्या सप्टेंबर महिन्यात पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र स्टेट लीग मॅचेससाठी या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. निवड झालेले खेळाडू योगिन जाधव बॅट्समन आणि विकेट कीपर, कार्तिक सदावर्ते अष्टपैलू (ऑलराऊंडर),संघर्ष जाधवअष्टपैलू (ऑलराऊंडर),
इंद्रा घाटे बॅट्समन यांचा समावेश आहे.
चिखली येथील सुप्रसिद्ध KCA क्रिकेट अकॅडमीमध्ये हे चारही खेळाडू नियमित सराव करतात. या अकॅडमीमध्ये क्रिकेटसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून, विशेष म्हणजे येथे दिवस-रात्र सरावाची सुविधा आहे. सध्या या अकॅडमीमध्ये जवळपास 25 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.
चिखलीतील युवकांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने सुरेश बोंद्रे यांनी हे व्यासपीठ मिळवून दिले आहे. त्यांच्या या कार्याचे पालक वर्गातून आभार मानले जात आहेत.
या चारही खेळाडूंना मिळालेल्या संधीमुळे संपूर्ण चिखली शहरातून त्यांचे कौतुक होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
