Khabarbat News-*शेती, शिक्षण व मुला-मुलींच्या लग्नाच्या समस्येवर काम करा - डॉ. रणजीत सपकाळ*





*मराठा मंडळाची सर्वसाधारण सभा व दसरा संमेलन संपन्न*

नितीन फुलझाडे 

*अकोला -* आज शेती अडचणीत आली आहे, शिक्षण महागडे झाले आहे, तरुणांना रोजगार नाही व मुला-मुलींची लग्ने जुळत नाहीत, या गंभीर समस्या समाजासमोर आहेत. मंडळाने यावर काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाबीजचे संचालक डॉ. रणजीत सपकाळ यांनी केले.


अकोला जिल्हा मराठा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व दसरा संमेलनात ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश ज्ञानदेवराव पाटील होते. 


व्यासपीठावर ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार, रामेश्वर फुंडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, माजी आमदार वसंतराव खोटरे, उपाध्यक्ष दिवाकर पाटील, कोषाध्यक्ष डॉ. विनोद बोर्डे, सचिव प्रा.डॉ. विवेक हिवरे, सहसचिव श्रीकांत पागृत, अनिल राऊत, पंकज देशमुख, संजय सरप, डॉ. निखिल बोर्डे, डॉ. विनीत हिंगणकर, निलेश पाचडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.


मंडळाच्या १०४ व्या सर्वसाधारण सभेची सुरुवात राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून झाली. यावेळी विविध ठराव पारित करण्यात आले. दसरा संमेलनात सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. साऊथ आफ्रिकेहून आलेले मकरंद सवाई व पीएचडी प्राप्त डॉ. गजानन चोपडे यांचा सन्मान करण्यात आला.


*महादेवराव भुईभार म्हणाले -* पूर्वजांनी एकत्र येऊन समाजाच्या भल्यासाठी मंडळाची स्थापना केली. आजही कार्यकर्त्यांनी आपली कामे सांभाळून मंडळाच्या विकासासाठी झोकून देऊन काम करावे.


*रामेश्वर फुंडकर म्हणाले -* समाजाच्या आजच्या समस्येवर मंथन करण्याची गरज आहे. विवाहाची समस्या, पालकांची समस्या याची तरुण पिढीला जाणीव करून द्या. ३० ते ४० वयोगटातील तरुणांना मंडळाच्या कामात जोडा. तरुणाईला दिशा दिली तर मंडळाचे काम पुढे जाईल.


*प्रकाश पाटील म्हणाले -* समाजातील ज्येष्ठांच्या प्रेरणेने मंडळाची वाटचाल सुरू आहे. यापुढेही समाजाला आवश्यक बाबींवर विचारविमर्श करून विधायक कार्यक्रम राबवले जातील.दुष्काळाचे सावट लक्षात घेता कमीत कमी खर्चात लग्न कार्य करण्याचे आवाहन अध्यक्षीय भाषणात केले.

*आमदार रणधीर सावरकर यांची भेट*

यावेळी अकोला पूर्व चे आमदार रणधीर सावरकर यांनी दसरा संमेलनास भेट देऊन मंडळाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा.डॉ. विवेक हिवरे यांनी केले. अल्पोपहाराने सभेची सांगता झाली. यावेळी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post