अमडापूर मंडळ भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल साठे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन..
चिखली:- दुष्काळी परिस्थिती आणि शेतीतील आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळण्यात अडथळे येत असल्याचा मुद्दा समोर आला आहे. भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) उदयनगर शाखेत सातबारा उताऱ्यावर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अथवा नागरी पतसंस्थेचा बोजा असल्याचे कारण पुढे करून नवीन पीक कर्ज देण्यास अडचणी येत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे अमडापूर मंडळाचे तालुकाध्यक्ष अमोल साठे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी, अमडापूर मंडळ तसेच अमडापूर व उदयनगर भाजपाच्या वतीने शाखा व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनाची दखल घेत चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी भारतीय स्टेट बँकेच्या उदयनगर शाखेच्या व्यवस्थापकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळताना अनावश्यक अडवणूक होऊ नये आणि कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना नियमानुसार नवीन पीक कर्ज मिळावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. कर्जमाफीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतरही सातबारा उताऱ्यावरील पतसंस्थेच्या बोजाचे कारण पुढे करून नवीन पीक कर्ज देण्यास अडथळे येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी, बुलढाणा यांनी यापूर्वी पतसंस्थेचा बोजा असतानाही पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासंदर्भात निर्देश दिले असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या आदेशांच्या अनुषंगाने संबंधित प्रकरणांची तपासणी करून लागू असलेल्या शासन निर्णयांचे व बँकिंग नियमांचे पालन करावे आणि पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतीच्या हंगामात बियाणे, खते आणि इतर शेतीच्या निविष्ठा खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. पीक कर्जासाठी विलंब झाल्यास शेतकऱ्यांच्या शेती नियोजनावर परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन आमदार श्वेता महाले पाटील यांनी संबंधित बँक व्यवस्थापकांशी चर्चा केली.
“शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवताना अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागू नये. शासनाचे नियम आणि लागू असलेल्या आदेशांनुसार पात्र शेतकऱ्यांच्या कर्जप्रकरणांचा विचार करण्यात यावा. कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, याची बँक प्रशासनाने काळजी घ्यावी. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना वेळेत दिलासा देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी,” अशी भूमिका आमदार महाले यांनी व्यवस्थापकांशी बोलताना मांडल्याचे सांगण्यात आले.
निवेदनातून पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जाचे वाटप तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. बँकेने शासकीय आदेश व लागू मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही न केल्यास शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने बँकेसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जितेंद्र कलंत्री,संजय महाले, दिगंबर राऊत, पुरुषोत्तम अवचार, विठ्ठल कलंत्री, मुरलीधर हेलगे, प्रमोद घोटपी, प्रमोद क्षीरसागर, श्रीकांत राऊत, शिवाजी साठे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व नागरिक हजर होते.
