तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन सभा चिखली व बुलढाणा येथे संपन्न..
चिखली तालुका व चिखली विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या बुलढाणा तालुक्यातील गावासाठी तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन सभेत चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी कृषी विभागाच्या कामकाजातील उणिवांवर थेट बोट ठेवत संबंधित अधिकाऱ्यांना कडक शब्दांत ताकीद दिली. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी न होणे, विविध विभागांमध्ये समन्वयाचा अभाव आणि फलोत्पादन योजनांचा अपुरा प्रसार या मुद्द्यांवर आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
*कृषी विभागाच्या दोषांवर आमदारांचे परखड भाष्य*
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसंदर्भात कोड जनरेट करणे, मस्टर काढणे, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणे या प्रक्रियेत मागील वर्षी असंख्य तक्रारी प्राप्त झाल्याची गंभीर दखल आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी घेतली. यावर्षी सुधारणा न झाल्यास मी स्वतः लक्ष घालून कठोर कारवाई करेन, असा स्पष्ट इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. पीककर्ज वाटपापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही त्यांनी बँका व सहकार विभागाला जाब विचारला.
शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खते, बी बियाणे, कृषी कर्ज उपलब्ध होण्यासाठी कृषी विभाग, कृषी केंद्रे, सहकार विभाग आणि महसूल विभाग यांच्यात योग्य समन्वय असणे अत्यावश्यक असल्याचे आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी ठणकावून सांगितले. "विभागांनी एकत्र येऊन काम केले तरच शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल," असे त्या म्हणाल्या. जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद, कृषी विभाग यांनी सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, पाझर तलाव आदी संरचनांची दुरुस्ती तातडीने पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
चिखली तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात ७३,००० हेक्टरवर सोयाबीन पेरणीचे नियोजन असले तरी, सोयाबीनसोबत इतर पिकांकडेही शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी केले. फलोत्पादन क्षेत्र वाढविण्यासाठी पोकरा, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना आणि महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा प्रभावीपणे वापर व्हावा, यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मागील वर्षी हुमणी अळीमुळे झालेल्या नुकसानाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कृषी विभागाने वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, असा इशाराही त्यांनी दिला.
कापूस उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने कापूस पीक परिसंवाद कार्यशाळा आयोजित करण्याचे आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन देण्यासाठी कृषी विभागाने सक्रिय भूमिका बजावावी, असेही त्यांनी सांगितले.
चिखली तालुक्यात महाविस्तार A.I. ॲपचा वापर होत असल्याबद्दल आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी कृषी विभागाचे अभिनंदन केले. मात्र AGRISTACK योजनेंतर्गत शेतकरी नोंदणीचे लक्ष्यांक आणखी वाढवण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे अनुदान शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
संपूर्ण अमरावती महसूल विभागात चिखली विधानसभा मतदारसंघाला सर्वाधिक लाभ मिळाल्याचे नमूद करत आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी भविष्यातही हे यश अबाधित राखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व जबाबदारीने काम करावे, असा आग्रह धरला. येणारा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक सोयीस्कर आणि फायदेशीर ठरावा, यासाठी कृषी, महसूल, सहकार व जलसंधारण या सर्व विभागांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
चिखली विधानसभा मतदारसंघांतर्गत बुलढाणा तालुक्यातील गावांसाठी देखील बुलढाणा येथे स्वतंत्र खरीप पूर्व आढावा बैठक घेण्यात आली,बुलढाणा येथील बैठक बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पार पडली.
चिखली येथील बैठकीस खालील मान्यवर होते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मा. श्री. संतोष डाबरे, तालुका कृषी अधिकारी मा. श्री. अशोक जी. सुरडकर, मंडळ कृषी अधिकारी दिनेश लंबे, मंडळ कृषी अधिकारी भगवान कुलकर्णी, मंडळ कृषी अधिकारी श्री. विजय धांडे, डॉ. कृष्णकुमार सपकाळ (भाजप तालुका अध्यक्ष), संजय जी. महाले, संतोष काळे (जिल्हा अध्यक्ष भाजप युवा मोर्चा), जितेंद्र कलंत्री, सुधीर चेके पाटील, अशोक पाटील, नीरज गायकवाड (तालुका अध्यक्ष भाजप युवा मोर्चा), महेश महाजन (अध्यक्ष असोसिएशन) आदी मान्यवर उपस्थित होते.
तर बुलढाणा येथील बैठकीस आ. संजय गायकवाड, देविदास पाटील (जिल्हा उपाध्यक्ष भाजप), अनिलभाऊ जाधव (तालुकाध्यक्ष भाजप), सुनील देशमुख (भाजप नेते), योगेश राजपूत (भाजप नेते), डॉ. राजेश्वर उबरहांडे (भाजप नेते), श्री. संदीप उगले (भाजप नेते), श्री. सतीश भाकरे (तालुका अध्यक्ष भाजप) आदी उपस्थित होते...
