नितीन फुलझाडे
चिखली:- शहरातील माळी समाज संघटन यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जन्मोत्सव २०२६ चे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक जाणीव, सामाजिक भान तसेच लेखनकौशल्य वृद्धिंगत व्हावे या उदात्त उद्देशाने निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला शहरातील शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सदर निबंधलेखन स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली होती.
गट क्रमांक १ (इयत्ता ४ थी ते ७ वी) या गटात एकूण ४१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. गोपाल शंकर दिलवाले ते गारवी बद्रीनारायण खरात यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने स्पर्धेत सहभाग घेत आपली लेखनकला सादर केली.
गट क्रमांक २ (इयत्ता ८ वी ते १२ वी) या गटात अर्पिता पुरुषोत्तम भराड, श्रेया गजानन काकडे, श्र्लोक विजय मेहेत्रे, पल्लवी गजानन मेहेत्रे, श्रेया भारत खरात व आर्या प्रसाद भराड या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी आपल्या निबंधांतून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे थोर जीवनकार्य, स्त्री शिक्षणासाठी केलेले अतुलनीय योगदान तसेच सामाजिक समता, न्याय व प्रबोधनाचा संदेश अत्यंत प्रभावीपणे मांडला. विद्यार्थ्यांच्या विचारांमधून समाजपरिवर्तनाची प्रेरणा स्पष्टपणे जाणवत होती.
सायंकाळी ७.३० वाजता सहभागी विद्यार्थ्यांचे अभिवादन व बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचे मनापासून कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट व संयत सूत्रसंचालन कु. पूजा ज्ञानेश्वर मेहेत्रे हिने केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रकाश सपकाळ, भरत खरात, नारायण राऊत, रामेश्वर मेहेत्रे, सुचित भराड व ज्ञानेश्वर मेहेत्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.
हा संपूर्ण उपक्रम माळी समाज संघटन, चिखली शहर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. अशा सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच सामाजिक मूल्ये, समतेचा विचार व महापुरुषांच्या कार्याची प्रेरणा मिळते, असे मत आयोजकांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमास शहरातील असंख्य महिला व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
