अमोल खबुतरे यांच्या वतीने चांधई येथील जि. प. प्रा. शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षा पॅडचे वितरण
नितीन फुलझाडे
चिखली : प्रजासत्ताक दिन म्हणजे केवळ ध्वजारोहणाचा सोहळा नव्हे, तर स्वातंत्र्य, संविधान, संस्कार आणि सेवाभाव यांचे स्मरण करून देणारा पवित्र उत्सव होय. याच भावनेतून चिखली शहरालगत असलेल्या चांधई येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये यंदाचा प्रजासत्ताक दिन सामाजिक बांधिलकी जपणारा आणि ग्रामीण भागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देणारा ठरला. चिखली नगरपरिषदेतील भाजप गटनेते व नगरसेवक अमोल खबुतरे यांच्या वतीने दि. २६ जानेवारी या पवित्र दिवशी शाळेतील तब्बल १८० विद्यार्थ्यांना परीक्षा पॅडचे वाटप करत त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला मोलाचा आधार दिला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत साधनांची कमतरता जाणून घेत, ती भरून काढण्याचा हा प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. अशा सेवाभावी कृतींमुळे शाळा ही केवळ पुस्तकांपुरती मर्यादित न राहता, संस्कार, संवेदना, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचे केंद्र बनते, हेच या उपक्रमातून अधोरेखित झाले. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परीक्षा पॅडवरून दिला विद्यार्थ्यांना ‘अनमोल’ जीवनमंत्र
परीक्षा पॅडवर अमोल खबुतरे यांनी विद्यार्थ्यांसाठी लिहिलेला संदेश हा केवळ शब्दांचा संच नव्हता, तर तो त्यांच्या भविष्यास दिशा देणारा अनमोल जीवनमंत्र ठरला. “हे वय हसण्याखेळण्याचे असले, तरी तुमच्या भविष्याचा पाया याच काळात भक्कम होतो. मन लावून अभ्यास करा, गुरुजनांचा आणि मोठ्यांचा आदर ठेवा. स्पर्धेच्या युगात शिक्षणाशिवाय पर्याय नाही. निरोगी स्पर्धा करत पुढे जा, वाईट संगतीपासून दूर रहा, मोबाईलचा वापर मर्यादित ठेवा आणि आरोग्याकडे लक्ष द्या,” असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. कला, क्रीडा, विज्ञान अशा सकारात्मक क्षेत्रांमध्ये आवड जोपासण्याचे आवाहन करत, “अडचणी आल्यास मदतीसाठी हक्काने माझ्याशी संपर्क साधा,” हा दिलासा देणारा शब्द विद्यार्थ्यांच्या मनाला स्पर्शून गेला.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राबवलेला हा उपक्रम म्हणजे संवैधानिक मूल्यांना कृतीत उतरवणारा सेवाभावाचा जिवंत प्रत्यय ठरला असून, समाजातील इतर घटकांसाठीही तो प्रेरणास्थान बनला आहे.
