Khabarbat News- चिखलीत पैठण येथून शेगाव येथे जाणाऱ्या संत गजानन महाराज पालखीचे भव्य स्वागत

 


नितीन फुलझाडे 

चिखली: 

पैठण येथून शेगावकडे प्रस्थान केलेल्या संत गजानन महाराजांच्या पवित्र पालखीचे चिखली शहरात बुधवारी भक्तिभावपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. शहरातील अंबिका अर्बन पतसंस्थेच्या अध्यक्षा डॉ. संध्या कोठारी व ॲड. विजय कोठारी यांच्या निवासस्थानी दि.२८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता पालखीचे आगमन झाले.


पालखी आगमनानंतर ॲड. विजय कोठारी, डॉ. संध्या कोठारी, धनश्री अर्बनचे अध्यक्ष अजय कोठारी तसेच मंजुश्री कोठारी यांच्या हस्ते पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी सोबत आलेल्या वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. वातावरणात टाळ मृदुंगाचा गजर, गण गण गणात बोते जय घोषाने ,आरती व भजनाने  परिसर दुमदुमून गेला होता.


पूजन व आरतीनंतर वारकऱ्यांसाठी व चिखली परिसरातील भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या पालखी सोहळ्याचे प्रमुख पैठण येथील चिंचोळकर महाराज हे होते. विशेष म्हणजे, गेल्या २२ वर्षांपासून ही पालखी कोठारी कुटुंबीयांच्या निवासस्थानी येत असल्याने हा धार्मिक सोहळा चिखलीकरांसाठी श्रद्धेचा आणि परंपरेचा भाग बनला आहे.


यावेळी आमदार श्वेताताई महाले पाटील नगराध्यक्ष पंडितराव देशमुख नगरपालिकेचे नगरसेवक यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. सर्वांनी पालखीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.


संपूर्ण कार्यक्रम भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Previous Post Next Post