Khabarbat News- चिखली तालुका पत्रकार संघाने शहिदांच्या स्मृतींना केले अभिवादन

 



प्रजासत्ताक दिनानिमित्त अनोखा उपक्रम


नितीन फुलझाडे 

चिखली : "शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मिटने वालों का यही बाकी निशां होगा" 

                 देशाच्या रक्षणासाठी बलिदान केलेल्या वीरांचे पुण्यस्मरण करून देणाऱ्या ह्या ओळींची प्रचिती चिखली तालुका पत्रकार संघाच्या एका अनोख्या उपक्रमाने आणून दिली. २६  जानेवारी रोजी सर्वत्र साजरा झालेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न चिखली तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांनी शहरातील शहीद स्मारकांना भेट देऊन वीर जवानांच्या स्मृतींना अभिवादन केले.  

              सर्वप्रथम चिखली शहरालगत असलेल्या शेलुद येथील शहीद जवान  दिलीप हरीभाऊ जाधव यांच्या स्मृतिस्थळाला पत्रकार संघाच्या सदस्यांनी  भेट  दिली. शहीद दिलीप जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून  पत्रकार संघाच्या वतीने अभिवादन केले.  त्यानंतर मलकापूर सोलापूर -  महामार्गावर असलेल्या वीर जवान कैलास भारत पवार  यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन तेथे देखील शहीद जवानांच्या स्मृतींना पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले. सिध्दार्थ नगर  मधील शहीद जवान विजय लक्ष्मण भिसे  यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन तेथे देखील  पत्रकार संघाच्या वतीने   पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. 

                चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन फुलझाडे यांच्या नेतृत्वात राबवल्या गेलेल्या या उपक्रमात पत्रकार संघाचे सचिव महेश गोंधणे, उपाध्यक्ष भिकू लोळगे यांच्यासह जेष्ठ सदस्य रवींद्र फोलाने, रेणुकादास मुळे, कैलास गाडेकर, राजेश बिडवे, असलम  हिरीवाले आणि मोहन चौकेकर या पत्रकार बांधवांनी सहभाग घेतला होता.

Previous Post Next Post