Khabarbat News- चिखलीत सकल मातंग समाजाचा अनुष्काला न्याय मागणीसाठी कॅन्डल मार्च

 


नितीन फुलझाडे 




एसआयटी चौकशीची मागणी करत सकल मातंग समाज आक्रमक; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा


चिखली(बुलढाणा) :-  लातूर जिल्ह्यातील मौजे काटा (ता. औसा) येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या वस्तीगृहात इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या निरागस अनुष्का पाटोळे (वय १२) हिचा दि. ३ जानेवारी रोजी रात्री झालेला संशयास्पद मृत्यू संपूर्ण समाजमनाला हादरवून सोडणारा आहे. हा मृत्यू हत्या की आत्महत्या, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी या प्रकरणातील सत्य बाहेर यावे व दोषींना कठोर शिक्षा व्हावी, तसेच अनुष्काला न्याय मिळावा, या मागणीसाठी चिखली तालुक्यातील सकल मातंग समाजातर्फे भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला.
या कॅन्डल मार्चमध्ये असंख्य महिला व पुरुष नागरिकांनी हातात मेणबत्त्या घेऊन सहभागी होत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. चिखली शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कॅन्डल मार्चची सुरुवात करण्यात आली.  तसेच पोलीस लाईन – सिंधी कॉलनी चौक – अंजली टॉकीज मार्गे हा मोर्चा पुढे जात स. अशोक, फुले–आंबेडकर वाटीकेत समारोप झाला.
अशोका वाटिका येथे झालेल्या समारोप प्रसंगी उपस्थित सर्व सामाजिक मान्यवरांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. ज्येष्ठ नेते कैलासराव खंडारे यांनी अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा सरकारला दिला. तर युवा नेते भाई छोटू कांबळे यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी  जोरदार मागणी केली.
याप्रसंगी ज्येष्ठ वकील ऍड. राजीव जाधव, राजू गवई सर, मिलिंद मघाडे, प्रवीण कांबळे, सचिन कांबळे, किरण बोरकर, योगेश साळवे, विलास घोरपडे, विलास निकाळजे, भरत जोगदंडे, विजय सोनवाल आदी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 
हा कॅन्डल मार्च शांत, शिस्तबद्ध व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला. नागरिक, सामाजिक संघटना व न्यायप्रिय लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत अनुष्काला न्याय मिळावा, अशी एकमुखी मागणी केली.
Previous Post Next Post