Khabarbat News- अंत्री खेडेकर येथील सोमेश खेडेकर ‘कला सन्मान पुरस्काराने सन्मानित

 


नितीन फुलझाडे 

चिखली : छत्रपती संभाजीनगर येथील SG फिल्म प्रोडक्शन यांच्या वतीने नुकताच कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवकांना कला सन्मान पुरस्कार २०२६ देऊन गौरविण्यात आले.  यामध्ये तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील सोमेश संजय खेडेकर यास ‘बेस्ट एडिटर’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

                  छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल संस्कृती येथे पार पडलेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात हा गौरव  मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक आकाश बोर्डे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखिका डॉ. विना माळी, प्रसिद्ध कवी पवन शेळके व गीतकार शुभम साळवे हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सोमेश खेडेकर यांना सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. SG फिल्म प्रोडक्शनचे प्रमुख शुभम गंगावणे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला कला सन्मान पुरस्कार २०२६ हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. एडिटिंग क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले सोमेश खेडेकर यांनी आपल्या उत्कृष्ट कला कौशल्याच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते एक अनुभवी व तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्हिडिओ एडिटर असून, आपल्या “आपली चिखली ऑफिशियल” या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व जनजागृतीपर विषयांवर आधारित व्हिडिओ तयार करून ते प्रभावीपणे जनतेपर्यंत सातत्याने पोहोचवत आहेत.  हा पुरस्कार स्वीकारताना सोमेश खेडेकर यांनी आपल्या कुटुंबीयांचे, मित्रपरिवाराचे व चिखलीकरांचे आभार मानत, भविष्यातही एडिटिंग व मीडिया क्षेत्राच्या माध्यमातून समाजासाठी अधिक प्रभावी व दर्जेदार काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

                कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका नेहा खंडागळे हिच्या सुमधुर गायनाने उपस्थितांची मने जिंकली. तर या पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रभावी सूत्रसंचालन वैभवी तवर व धनश्री धोंडगे यांनी केले व आभार प्रदर्शन निर्मल कनगारे यांनी केले.

Previous Post Next Post