नितीन फुलझाडे
परिवर्तन सभेला विक्रमी प्रतिसाद
चिखली :
चिखली नगरपरिषद निवडणूक 2025 पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राजा टॉवर येथे आज बुधवार रोजी झालेल्या परिवर्तन सभेला विक्रमी प्रतिसाद मिळाला. नागरिक, युवक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहता ही सभा चिखलीतील निवडणुकीचा कल ठरवणारी ठरू शकते, अशी चर्चा शहरात सुरू आहे.
सभेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांना पूर्ण पाठिंबा देत अजितदादा पवार म्हणाले, “चिखलीच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. निलेश गावंडेंनाच शहराची जबाबदारी द्या. घाबरू नका… राज्य सरकार तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहे.”
ते पुढे म्हणाले की, चिखलीतील पाणीपुरवठा, रस्ते, नाले, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांसाठी लागेल ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्यास राज्य सरकार वचनबद्ध आहे. “राजकारणात सत्ता उपभोगायला नसते, तर जनतेची सेवा करण्यासाठी असते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
अजितदादांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आठवण करून देत सर्वसमावेशक विकासाचा संदेश दिला. “महाराजांनी १८ पगड जातींना सोबत घेऊन रयतेचे राज्य उभारले. चिखलीचा विकास सर्व समाजघटकांना सोबत घेऊनच करायचा आहे,” असे ते म्हणाले. सभेला मुस्लिम, मराठा, ओबीसी, बहुजन, ब्राह्मण आणि हिंदी भाषिक समाजाची उपस्थिती लक्षणीय होती.
आपल्या भाषणात प्राचार्य डॉ. निलेश गावंडे म्हणाले, “शिक्षक म्हणून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले, आता चिखली शहराचे आधुनिक आणि शाश्वत भविष्य घडवण्याचा निर्धार केला आहे. शिक्षण, रोजगारनिर्मिती, स्वच्छता, रस्ते, पायाभूत सुविधा आणि स्मार्ट सेवा हा माझा प्राधान्यक्रम असेल. जनतेच्या आशीर्वादाने चिखलीला आदर्श शहर बनवू.”
सभेला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना महायुती व शिवसेना शिंदे गटाचे अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात आमदार अमोल मिटकरी, आमदार मनोज कायंदे, विधान परिषद सदस्य संजय खोडके, जिल्हाध्यक्ष एड. नाझेर काझी, जिल्हा कार्याध्यक्ष शंतनु बोंद्रे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष देव्हडे, मनोज दांडगे, भास्कर मोरे, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष कपिल खेडेकर, रोहित खेडेकर, कैलास भालेकर, शहराध्यक्ष तुषार बोंद्रे, तालुका अध्यक्ष संतोष परिहार, उपजिल्हाप्रमुख शिवाजी देशमुख, इरफान अली, युवक राष्ट्रवादी शहराध्यक्ष वसीम शेख, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माया ताई म्हस्के, शेखर बोंद्रे आणि संतोष लोखंडे यांचा समावेश होता. तसेच महायुतीचे सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सभेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांच्या उमेदवारीला मोठे बळ मिळाल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात असून तिऱंगी लढतीत महायुतीचा प्रभाव वाढल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. अनेकांच्या मते, आजची सभा चिखलीचा अंतिम निकाल ठरवणारी ठरू शकते.
