Khabarbat news- काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्या प्रचारसभेला अभूतपूर्व प्रतिसाद...

 





चिखलीत मविआला विजयी करून लोकशाहीवादी प्रशासनाला बळ द्या :  संदेश आंबेडकर

चिखली : संविधानाला अभिप्रेत असलेली समता, बंधुता आणि सर्वधर्मसमभाव ही भूमिका काँग्रेसने आजवर समर्थपणे जपली आहे. काँग्रेस पक्षामुळे देश एकसंध राहिला तर भाजपच्या राजकारणामुळे हुकुमशाही, द्वेष, विभाजन आणि जातीय संघर्षाला खतपाणी मिळत आहे. चिखलीकरांनी महाविकास आघाडीला विजयी करून लोकशाहीवादी प्रशासनाला बळ द्यावे, असे आवाहन संदेश आंबेडकर यांनी केले आहे.

शहरातील प्रभाग १२ मध्ये मविआच्या आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे, मविआचे नगरअध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे, प्रभाग १२ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार मोहम्मद आसिफ शरीफ, सौ. सुप्रिया प्रशांत भटकर यांच्यासह मविआचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिखली नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय वातावरण तापले असताना संविधानिक मूल्ये, सर्वधर्मसमभाव आणि विकास या तीन मुद्द्यांवर काँग्रेस तसेच महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.


भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त चिखली करणार : राहुलभाऊ बोंद्रे

जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांनी चिखलीतील मागील काही वर्षांत निर्माण झालेल्या असंतोषाचा उल्लेख करत प्रशासनातील अनागोंदी, पक्षपात, भीतीचे वातावरण आणि भ्रष्टाचारावर थेट प्रहार केला. चिखलीच्या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासासाठी मविआची सत्ता आवश्यक आहे. आम्ही भयमुक्त व भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा संकल्प केला आहे. चिखली शहराला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही ठोस नियोजन केले, असल्याचे राहुलभाऊ बोंद्रे म्हणाले.


चिखलीला विकासाच्या बाबतीत अग्रेसर करु : काशिनाथ आप्पा बोंद्रे

महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे यांनी शहराच्या विकास आराखड्याविषयी विस्तृत भाष्य केले. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते-विस्तारीकरण, स्ट्रीट लाइट, नागरिकांसाठी पारदर्शक सेवा आणि डिजिटल प्रशासन अशा विविध विषयांवर त्यांनी नागरिकांना आश्वस्त केले. चिखलीला विकासाच्या बाबतीत राज्यात अग्रेसर करण्याचा आमचा संकल्प आहे. नागरिकांच्या प्रत्येक गरजेसाठी पारदर्शक सेवा देणारे प्रशासन उभारणे हे माझे प्राधान्य असल्याचे ते म्हणाले.
Previous Post Next Post