नितीन फुलझाडे
चिखली:- बिहार राज्यातील निवडणुकांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना मिळालेल्या मोठ्या विजयाचा जल्लोष आज चिखली शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे नेतृत्व चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी केले. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात एकत्र येत विजयाबद्दल आनंद व्यक्त केला.
या वेळी बोलताना आमदार श्वेता महाले पाटील म्हणाल्या, “बिहारमधील विजय हा देशातील नागरिकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास धोरणांवरील विश्वास आहे. महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हा प्रभाव दिसेल आणि भाजप नंबर एकचा पक्ष राहील, याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे.”
पुढे त्या म्हणाल्या, “देशात मोदीजी, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि स्थानिक पातळीवर चिखलीचा विकास — ही तीन इंजिनं वेगाने काम करत आहेत. आता चिखली नगरपरिषद ही विकासाची ‘चौथी इंजिन’ बनेल. येथील मतदार निश्चितच भाजपाला मोठ्या प्रमाणात मत देतील आणि स्वतःचा नगराध्यक्ष निवडून आणतील.”
त्यांच्या या विश्वासदर्शक भूमिकेमुळे चिखली भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला असून आगामी नगरपरिषद निवडणुकीची हवा आजच्या जल्लोषामुळे अधिक रंगतदार झाली आहे.
