Khabarbat news- चिखलीत राष्ट्रवादी शिवसेना नगर परिषद निवडणुक एकत्र लढणार

  


नितीन फुलझाडे 

चिखली : नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. चिखलीत महायुती होणार का? याकडे कार्यकर्ते व सर्वसामान्य मतदाराचे  लक्ष लागले असून सर्वच संभ्रम अवस्थेत आहे. महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाने अद्यापही राज्यात आणि केंद्रात मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला चर्चेचे निमंत्रण दिलेले नाही. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र बैठक घेत नगर परिषद निवडणुक युतीमध्ये लढण्याचा निर्णय घेतला आहे.

10 नोव्हेंबर पासून नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून अद्यापही राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती संदर्भात एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांची महत्त्वाची बैठक आमराई मधील गजानन महाराज मंदिरात पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष मनोज दांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता खरात, शिवसेना नेते कपिल खेडेकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संतोष परिहार, शिवसेना तालुका अध्यक्ष गजानन मोरे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष तुषार बोंद्रे, शिवसेना शहर अध्यक्ष विलास घोलप, राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष शेखर बोंद्रे, ओबीसी जिल्हाध्यक्ष सुभाष देव्हाडे यांच्यासह दोन्ही पक्षातील सर्व इच्छुक उमेदवार हजर होते. 

लोकसभा आणि विधासभा निवडणूक आपण महायुतीमध्ये लढलो असून कार्यकर्त्यांची ही निवडणूक देखील आपण महायुतीमध्येच लढावी अशी भावना सर्वांची आहे, परंतु अद्यापपर्यंत मित्रपक्ष असलेल्या भाजपकडून कुठलच निमंत्रण मिळालेलं नाही. त्यामुळे वेळ कमी असल्याने वरिष्ठांच्या आदेशाने आपण आज ही बैठक बोलाविली असून येणारी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र मिळून लढू असे आवाहन मनोज दांडगे यांनी केले. तर शिवसेना शहर प्रमुख विलास घोलप यांनी 14 ही प्रभागात नगरसेवकासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेजवळ प्रबळ उमेदवार असून आपण स्वतः नगर अध्यक्षाचे उमेदवार आहोत. जर भाजप आपल्याला विचारत नसेल तर आपण स्वतंत्र लढायला तयार आहोत.  त्यामुळे मी याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती झाली असल्याची घोषणा करतो असे विलास घोलप यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे चिखली नगर परिषद निवडणुकीत भाजप, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post Next Post