स्वदेशी जपा, स्वदेशी वाढवा आणी आपल्या माणसांची दिवाळी गोड करा.. आ. सौ. श्वेता महाले
नितीन फुलझाडे
चिखलीतील स्थानिक फटाका मार्केटला भेट देताना आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी नागरिकांना स्वदेशी उत्पादने वापरण्याचे आणि “वोकल फॉर लोकल” हा मंत्र अंगीकारण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “आपल्या देशाची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपायची असेल तर स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे.”
फटाका मार्केटचा फेरफटका मारताना आमदार महाले म्हणाल्या, “आपल्या देशात अनेक लघुउद्योग, कारखाने आणि हातगुण असलेले लोक दिवाळीच्या काळात फटाके, दिवे, सजावटीच्या वस्तू तयार करून वर्षभराच्या उत्पन्नाची अपेक्षा करतात. आपण त्यांच्या वस्तू खरेदी केल्या तर त्यांच्या घरातही दिवाळीचा प्रकाश जाईल. स्वदेशी वस्तू खरेदी केल्याने केवळ त्यांचा नव्हे तर आपल्या संपूर्ण देशाचा फायदा होतो.ही दिवाळी केवळ दिव्यांची नव्हे तर आत्मनिर्भरतेची असावी. प्रत्येक घरात स्वदेशी वस्तूंचा प्रकाश झळकू द्या,आपल्या लोकांची दिवाळी आनंदाची होऊ द्या असे आवाहन आ. सौ. श्वेता महाले पाटील यांनी केले.
त्यांनी पुढे चायनीज फटाक्यांच्या वापराबद्दल सावधगिरीचा इशारा दिला. “चायनीज फटाके बाहेरून आकर्षक दिसतात, परंतु त्यातून निघणारे विषारी रासायनिक वायू हे पर्यावरण आणि आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत. आपल्या देशातील उत्पादकांकडून बनवलेले फटाके तुलनेने सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि रोजगार निर्माण करणारे आहेत,” असे आमदार महाले म्हणाल्या.
त्या म्हणाल्या, “आपण ‘स्वदेशी खरेदी म्हणजे स्वाभिमान जपने’ या विचाराने खरेदी केली पाहिजे. चायनीज मालावर बहिष्कार घालणे म्हणजे केवळ परकीय वस्तूंना नाही म्हणणे नव्हे, तर आपल्या देशातील शेतकरी, कामगार, कारागीर, आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या कष्टाला सन्मान देणे आहे. आपण जितका स्वदेशी माल वापरू, तितका आपल्या देशाचा पैसा देशातच राहील आणि अर्थव्यवस्था मजबूत होईल.”
मतदारसंघातील सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच आ. सौ. श्वेता महाले यांनी स्वदेशीचा नाराही दिला याप्रसंगी त्यांचेसोबत पंडितदादा देशमुख, सागर पुरोहित, गुरुदत्त सुसर, विकी हरपाळे व इतर बरेच जन हजर होते.
