ग्रामीण रुग्णालय, चिखली येथे दिव्यांग बोर्ड व सोनोग्राफी मशीनचे लोकार्पण...

 


प्रत्येक आई-बहीण व मातेला योग्य उपचार मिळणे ही माझी जबाबदारी... आ. सौ. श्वेता महाले

नितीन फुलझाडे 

चिखली: मतदारसंघातील आरोग्य क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणखी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालय, चिखली येथे दिव्यांग बोर्ड व अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आज आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.

या प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सय्यद उमर, तसेच ग्रामीण रुग्णालयातील सर्व तज्ञ डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


महाविकास आघाडी सरकारच्या काळात ग्रामीण रुग्णालय चिखली येथे केवळ अत्यावश्यक आरोग्यसुविधांचा मोठा अभाव होता. परंतु आमदार श्वेता महाले पाटील यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे रुग्णालयाचे रूपांतर आता आधुनिक आरोग्यकेंद्रात झाले आहे.

त्यांनी रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू केले, तसेच गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरवरील लसीचे मोफत वितरण संपूर्ण विधानसभा मतदारसंघात केले.त्याचबरोबर आवश्यक बांधकाम कामांसाठी निधी उपलब्ध करून देत प्रशिक्षित व तज्ञ डॉक्टरांची नेमणूक व्हावी म्हणून सातत्याने पाठपुरावा केला.या सर्व उपक्रमांमुळे आज ग्रामीण रुग्णालय, चिखली हे संपूर्ण जनतेच्या उपचारासाठी सक्षम व सज्ज झालेले आरोग्यकेंद्र म्हणून उदयास आले आहे.


यापूर्वी अपंग प्रमाणपत्रासाठी चिखली तालुक्यातील दिव्यांग बांधवांना बुलढाणा येथे प्रवास करावा लागत होता, ज्यामुळे वेळ, पैसा आणि शारीरिक त्रास वाढत होता.आता आमदार श्वेता महाले पाटील यांच्या प्रयत्नातून चिखली येथेच दिव्यांग बोर्ड स्थापन करण्यात आला आहे.यामुळे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी चिखली विधानसभा मतदारसंघातील सर्व दिव्यांग बांधवांना अपंगत्व तपासणी व प्रमाणपत्र मिळणार आहे.

ही सुविधा सुरू झाल्यामुळे चिखली तालुक्यातील दिव्यांग नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


या कार्यक्रमात आमदार पाटील यांच्या हस्ते अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनचे लोकार्पणही करण्यात आले.या यंत्रणेमुळे आता चिखलीतील ग्रामीण रुग्णालयातच सोनोग्राफी तपासणी मोफत उपलब्ध होईल.यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह गर्भवती महिलांना महागड्या तपासण्यांसाठी खासगी दवाखान्यांकडे धाव घ्यावी लागणार नाही,असा महत्त्वाचा फायदा होणार आहे.


"रुग्णालय हे सर्वसामान्य जनतेचे आरोग्य मंदिर आहे. येथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही माझी जबाबदारी आहे. प्रत्येक आई, बहीण, मातेला योग्य वेळी उपचार मिळावेत, हीच माझी भूमिका आहे.”असे आमदार श्वेता महाले पाटील यांनी सांगितले.


या कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सय्यद उमर, नेत्रचिकित्सक डॉ. रवी शिंदे, अस्थिरोगतज्ञ डॉ. निकम, मानसोपचारतज्ञ डॉ. खर्चे, बालरोगतज्ञ डॉ. रामानंद इंगळे, तसेच डॉ. उमेश सावजी, डॉ. विठ्ठल काळुसे, डॉ. दीपक भगत, डॉ. प्रशांत चिंचोले, डॉ. अमोल राजपूत, डॉ. राहुल राजपूत, डॉ. नेहा चिंचोले, डॉ. प्रीती रिंडे, डॉ. रश्मी पाटील, डॉ. प्रतिक्षा वायाळ, डॉ. पल्लवी पाटील, डॉ. आदेश पखाले, डॉ. भूषण वानखेडे, डॉ. किशोर गवळी, डॉ. फारुख शेख, डॉ. प्रदीप मेहत्रे,रमेश डोके,सुशील वाहक, श्रीकृष्ण अवचार, सुशील वाघ, कार्तिक काकडे, संदीप दळवी, पुरुषोत्तम काळे, सुरज खिल्लारे, विशाल भगत, अमोल मेहत्रे, श्रीमती पूजा भांबळे, असलम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post Next Post