सभापती, सदस्य पदांची आरक्षण सोडत 13 ऑक्टोबरला ; राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
नितीन फुलझाडे
बुलढाणा, दि. 9 (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद गट व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती गणांच्या सार्वत्रिक निवडणुकीतील सभापती, सदस्य आरक्षण निश्चिती व सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत आणि सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदाच्या आरक्षणाची सोडत सोमवारी, 13 ॲाक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे काढण्यात येणार आहे.
तसेच पंचायत समित्यांच्या गणांची आरक्षण सोडत त्या त्या तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे. त्यानुसार बुलढाणा तालुक्यातील पंचायत समिती निर्वाचक गणासाठी आरक्षणाची सभा ही जिल्हा नियोजन समिती सभागृह या ठिकाणी आयोजित केली आहे. या आरक्षण सभेस सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बुलढाण्याचे तहसिलदार विठ्ठल कुमरे यांनी केले आहे.
राज्य निवडकणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दि. 6 ऑक्टोबरपर्यंत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी जागा निश्चित करण्यासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव तयार करुन विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करणे, दि. 8 ऑक्टोबरपर्यंत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांच्या प्रस्तावास मान्यता देणे, दि. 10 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडतीची सूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे, दि. 13 ऑक्टोबर रोजी आरक्षणाची सोडत काढणे, दि. 14 ऑक्टोबर रोजी प्रारुप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करणे, दि. 14 ते 17 ऑक्टोंबर 2025 दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील प्रारुप आरक्षणावर हरकती व सूचना सादर करणे, दि. 27 ऑक्टोबर रोजी प्राप्त प्रारुप आरक्षणावरील हरकती व सूचना आधारे अभिप्रायासह गोषवारा विभागीय आयुक्त यांना सादर करणे, दि. 31 ऑक्टोंबर 2025 रोजी प्रारुप आरक्षणावर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करुन आरक्षण अंतिम करणे, दि. 3 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे असा हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
चिखली पंचायत समिती आरक्षण सोडतीसाठी राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांनी उपस्थित राहावे- तहसीलदार संतोष काकडे
चिखली तालुक्यातील पंचायत समिती निर्वाचक गणासाठी आरक्षणाची सभा ही तहसील कार्यालय सभागृह 13 ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता या ठिकाणी आयोजित केली आहे. या आरक्षण सभेस सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन चिखली तहसिलदार संतोष काकडे यांनी केले आहे.

