शिवरत्न जिवाजी महाले जयंतीनिमित्त जामठीत उत्साहाचे वातावरण

 ​





शिवरत्न जिवाजी महाले जयंतीनिमित्त जामठीत उत्साहाचे वातावरण: दांडगे यांच्याकडून महिलांना रोजगार आणि स्वच्छता अभियानाची सुरुवात....


भव्य कीर्तन, सामाजिक प्रबोधन व भारुड महोत्सवाचे उदघाटन संपन्न...

नितीन फुलझाडे 

​जामठी: शिवरत्न जिवाजी महाले यांची जयंती जामठी ता.जि.बुलढाणा येथे आज उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे यांनी दोन महिलांना रोजगार उपलब्ध करून देत, मासरूळ जिल्हा परिषद सर्कलमधील आपल्या जामठी या गावात ‘गाव स्वच्छ’ अभियानाचा शुभारंभ केला.

​सर्व गावकऱ्यांच्या वतीने मनोज दांडगे यांच्या व गावकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी महापुरुषांचा आदर्श घेऊन मनोज दांडगे यांनी जामठी गावातील दोन महिलांना गावातील मंदिरे, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी नियुक्त केले.


*​रोजगार आणि समाजसेवेचा आदर्श:*

या महिलांना मनोज दांडगे यांनी वैयक्तिक स्तरावर रोजगार उपलब्ध करून दिला आहे. विशेष म्हणजे, या महिलांचा पगार ते आपल्या संस्थेच्या वतीने करणार आहेत. या माध्यमातून त्यांनी केवळ स्वच्छता अभियानाची सुरुवात केली नाही, तर गावातील महिलांना सन्मानाचा रोजगार मिळवून दिला आहे.


​ *भव्य कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन:* 

या निमित्ताने दीपावलीचे औचित्य साधत मासरूळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये भव्य कीर्तन, सामाजिक प्रबोधन व भारुड महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. गावकऱ्यांच्या उपस्थितीत रथास झेंडे दाखवून या महोत्सवाचे उद्घाटन जामठी येथे करण्यात आले. या महोत्सवात ह.भ.प. शिवलीलाताई पाटील आणि ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांच्यासह गोविंद महाराज गायकवाड, संदीप पाल महाराज, डॉ. रामपाल महाराज धारकर आदी मान्यवर आपली सेवा सादर करणार आहेत.


​या प्रबोधन पर्वात विविध मान्यवर आपली सेवा सादर करतील. महोत्सवाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

​१४ ऑक्टोबर २०२५: सातगाव येथे सायंकाळी ७.०० वाजता, ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन.

​२६ ऑक्टोबर २०२५: मासरूळ येथे सायंकाळी ७.०० वाजता गोविंद महाराज गायकवाड यांचा भारुड कार्यक्रम.

​३१ ऑक्टोबर २०२५: गुम्मी येथे सायंकाळी ७.०० वाजता संदीपपाल महाराज यांचा सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम.

०२ नोव्हेंबर २०२५: पाडळी येथे सायंकाळी ७.०० वाजता डॉ. रामपाल महाराज धारकर यांचा सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम.


९ नोव्हेंबर २०२५: धामणगाव येथे सायंकाळी ७.०० वाजता ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम.

​याशिवाय, १६, १७ व १८ नोव्हेंबर २०२५ रोजी जामठी येथे सायंकाळी ७.०० वाजता भव्य खुल्या भजन स्पर्धा संपन्न होणार आहेत. या सर्व कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


यावेळी गावातील नागरिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनोज दांडगे यांनी जयंतीनिमित्त रोजगार आणि प्रबोधन महोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श घालून दिला आहे.

Previous Post Next Post