नितीन फुलझाडे
चिखली : घटस्थापना ते विजयादशमी या नवरात्रोत्सव काळात श्री दुर्गामाता दौड चे आयोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चिखली विभागाच्या वतीने गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर या दौडीची सांगता भक्तिमय वातावरणात झाली. छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातून महादौडची सुरुवात होऊन संपूर्ण चिखली नगर प्रदक्षिणा करून पुन्हा छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे सांगता करण्यात आली.
या दौडमध्ये शेकडो युवक-युवती, महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भगवे फेटे, घोषणाबाजी, ढोल-ताशांच्या गजरात चिखली नगर दुमदुमून गेले. कार्यक्रमाच्या निमित्ताने नगरात धार्मिक व सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले.
श्री दुर्गामाता दौडीमुळे युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, संघटित शक्ती व हिंदू संस्कृतीचे भान दृढ होण्यास मदत झाल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले.
