नितीन फुलझाडे
आज सहकार संमेलन व ग्राहक मेळावा ; मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे राहुलभाऊ बोंद्रे यांचे आवाहन
चिखली : सलग चार वर्ष शून्य टक्के थकित, १०० टक्के विश्वास धारण केलेली तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या फायनान्शली साऊंड अँड वेल मॅनेज बँकेमध्ये समावेश असलेली अनुराधा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.चिखली ही जिल्ह्यातील एक आघाडीची बँक आहे. बँकेच्या वतीने ऋषितुल्य कर्मयोगी सिध्दविनायक उपाख्य तात्यासाहेब बोंद्रे यांच्या जयंतीनिमित्त व वार्षिक आमसभेनिमित्त यावर्षी सहकार संमेलन व ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शनिवार १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता परमहंस रामकृष्ण मौनीबाबा संस्थान, चिखली येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. या सहकार संमेलन व ग्राहक मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते होणार असून बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. सत्यजीत अर्बनचे अध्यक्ष शामभाऊ उमाळकर, अदिती अर्बनचे अध्यक्ष सुरेशजी देवकर, राजर्षी शाहू अर्बनचे अध्यक्ष संदीप शेळके, स्वातीताई वाकेकर, सुर्दशनजी भालेराव, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष दिपक देशमाने यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
अनुराधा अर्बन को-ऑप. बँकेने स्थापनेपासून सहकार क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी केली असून, ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. बँकेच्या वाढत्या व्यवहारात संचालक मंडळ, कार्यकारी अधिकारी तसेच ग्राहक वर्गाचा मोठा वाटा आहे. वार्षिक सभेच्या माध्यमातून संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासोबतच नव्या योजना व ग्राहकाभिमुख उपक्रम राबवले जातात. सहकार संमेलन व ग्राहक मेळाव्यामुळे सभासद, ठेवीदार व ग्राहकांना एकत्र येऊन संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. विविध योजनांची माहिती, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा तसेच भविष्यातील उपक्रम याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सहकार संमेलन व ग्राहक मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी,” असे आवाहन अनुराधा अर्बन को-ऑप. बँक लि., चिखली चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.
सलग चौथ्या वर्षी शून्य टक्के थकित
विदर्भ बँक असोसिएशनच्या वतीने विदर्भातील उत्कृष्ट बँक म्हणून केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते अनुराधा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा गौरव करण्यात आला आहे. बँकेचा ऑडीट वर्ग अ, सलग चौथ्या वर्षी शून्य टक्के थकित, पाच जिल्ह्यांची कार्यक्षेत्र परवानगी बँकेला मिळाली आहे. बँकेचे सध्याचे डिपॉझिट 122 कोटी, कर्जवाटप 74 कोटी आहे. तर चिखली मतदारसंघातील तरुण व बेरोजगार, कष्टकरी लोकांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तसेच ओबीसी महामंडळ यांच्या अंतर्गत कर्ज वाटप करून त्यांना बँकेने रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. हे विशेष..!
