बुलडाणा :- राज्यात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याची चर्चा सुरू असून या निर्णयाचा ओबीसी समाजाच्या हक्कांवर प्रत्यक्ष परिणाम होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. ओबीसी समाजाने यास तीव्र विरोध दर्शवून आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी आवाज उठविण्याचे ठरवले आहे.
याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तमाम ओबीसी समाजाच्या वतीने १५ सप्टेंबर रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे . या आंदोलनात ओबीसी संघटना, समाजातील नेते, महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
आंदोलनाचे आयोजक म्हणाले, “आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, मात्र ओबीसी समाजाचे आरक्षण व हक्क धोक्यात येणार असतील, तर गप्प बसणार नाही. शासनाने या प्रश्नाचा विचार संवेदनशीलतेने करावा आणि ओबीसींचे हक्क अबाधित राहतील याची खात्री द्यावी.”
दरम्यान, या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांना आवाहन करण्यात आले आहे. “ओबीसी समाजाचा हा लढा फक्त आरक्षणासाठी नसून आपल्या भावी पिढ्यांच्या भविष्याचा आहे. त्यामुळे समस्त ओबीसी समाजबांधवांनी एकदिलाने, आपल्या अस्तित्वासाठी मोठ्या संख्येने धरणे आंदोलनात सहभागी व्हावे,” असे भावनिक आवाहन निमंत्रक सतिशजी शिंदे यांनी केले आहे.
