येवता येथे वर्गखोलीचे भूमिपूजन :
चिखली तालुका : मौजे येवता येथे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नवीन वर्गखोलीच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार सौ. श्वेता ताई महाले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी गावातील नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना आमदार श्वेता ताई महाले म्हणाल्या, “उत्तम शिक्षण हाच उज्ज्वल भविष्याचा पाया आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. शिक्षणाच्या माध्यमातूनच गावाचे, तालुक्याचे व जिल्ह्याचे भविष्य उजळणार आहे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने बाळगली पाहिजेत आणि ती पूर्ण करण्यासाठी मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन. वर्गखोल्या, ग्रंथालय, संगणक व प्रयोगशाळा या सर्व सुविधा मिळवून देण्यासाठी मी आवश्यक तो निधी आणून देईन.”
आमदार महाले पुढे म्हणाल्या की, “गावातील मुलामुलींनी मोठ्या शहरात जाऊन उच्च शिक्षण घ्यावे, नोकऱ्या-उद्योग धंद्यात नाव मिळवावे, हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठीच शिक्षणक्षेत्रात गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. आपला प्रत्येक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत उतरावा, अधिकारी व्हावा, डॉक्टर-इंजिनियर व्हावा, हा माझा ध्यास आहे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा मी उपलब्ध करून देईन. शैक्षणिक प्रगतीमुळेच समाजात परिवर्तन घडते. म्हणूनच शिक्षण ही माझ्यासाठी केवळ योजना नसून एक सामाजिक जबाबदारी आहे.”
येत्या काळातही शिक्षण व विकास या दोन्ही आघाड्यांवर काम करण्याचा आपला निर्धार असल्याचे आमदार महाले यांनी स्पष्ट केले. त्यांनी गावकऱ्यांना सांगितले की, येवता गावातील अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावले आहेत. गावातील पाणीपुरवठा योजना, अंतर्गत रस्ते, पाणंद रस्ते, दोन गावांना जोडणारे रस्ते, शेतकऱ्यांसाठी नवीन ट्रान्सफॉर्मर, तसेच दळणवळणाच्या सुविधा अशा अनेक विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. गावात आणखी काही अडचणी असल्यास त्या सोडवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली.
या कार्यक्रमाला डॉ. कृष्णकुमार सपकाळ (तालुका अध्यक्ष भाजप), संतोष काळे (जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा), रोहितदादा खेडेकर (उपजिल्हा प्रमुख युवा सेना), गट शिक्षणाधिकारी अकिल पठाण, भास्कर वाघमारे, सरपंच वैशालीताई परिहार, उपसरपंच मनिषाताई परिहार, शोभाताई सुरडकर, जयताई मैंद, गुलाबराव परिहार, आशाताई वानखेडे, विलास परिहार, उद्धवराव खंडागळे, संजय खेडेकर, राहुल चव्हाण, ग्रामसेवक पडघान यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
