नितीन फुलझाडे
चिखली :- अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी बांधव हतबल झाले असले तरी त्यांचे अश्रू पुसण्यासाठी भाजपाचे लोकप्रतिनिधी पुढे सरसावत आहेत. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून तत्काळ मदतकार्य सुरू केले आहे. या संवेदनशील कार्यात हातभार लावण्यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी आपल्या आमदारकीचा एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे.
“आभाळ फाटले तरी ते शिवण्याची हिंमत आम्हाला आहे.पावसाने शेतकरी, माताभगिनी व जनावरे संकटात सापडली असली तरी त्यांची जिद्द हिरावण्याची ताकद या आपत्तीमध्ये नाही. शिवछत्रपतींचा वारसा लाभलेले आपण सर्वजण शेतकऱ्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहणे हीच खरी जबाबदारी आहे,” असे आमदार सौ. श्वेता महाले यांनी सांगितले.
शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. त्याच्या पंखात पुन्हा बळ भरण्यासाठी राज्यातील सर्व घटकांनी एकजुटीने हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार अतिवृष्टीग्रस्त भागात अहोरात्र मदतकार्य करत आहे. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांना दिलासा देणे हीच खरी लोकसेवा असल्याचे प्रतिपादन आमदार सौ. महाले यांनी केले.
