भाषण कला पुस्तकाचे शेनफड घुबे यांच्या हस्ते विमोचन

 




नितीन फुलझाडे 

चिखली : शब्द स्नेही म्हणून संपूर्ण जिल्ह्यात परिचित असलेले महातमखेड ता. चिखली येथील गणेश शेळके यांचे भाषण कला या पुस्तकाचा विमोचन सोहळा दि. 22 सप्टेंबर रोजी जानकीदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देऊळगांव घुबे येथे संपन्न झाला.

महातमखेड ता चिखली येथील गणेश शेळके यांनी लिहिलेले भाषण कला या पुस्तकाचे विमोचन भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, देऊळगाव घुबे चे संस्थापक अध्यक्ष शेनफडराव घुबे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शाळेचे प्राचार्य हरिदास घुबे, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना शेनफडराव घुबे म्हणाले की, विद्यार्थी जीवनात भाषण कला महत्वपूर्ण असून कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना मंचावर बोलणार्‍या व्यक्तीची वेगळी ओळख निर्माण होत असते. भाषण कला ही राजकीय क्षेत्रापुरतेच मर्यादित राहिली नसून विविध ठिकाणी ती उपयोगात येते. बोलण्यातून समोरचा प्रत्येक व्यक्ती आदर्श किंवा प्रेरणा आपल्या शब्दातून घेत असतो. तेव्हा राजकारणच नव्हे विविध मार्केटिंग कंपनी किंवा कोणते क्षेत्र असेल त्या ठिकाणी बोलणार्‍या व्यक्तीला प्राधान्य दिल्या जाते. बोलण्याची कला ही सर्वात मोठी कला असून ती प्रत्येकाने अवगत केली पाहिजे. गणेश शेळके यांच्या भाषण कला या पुस्तकाद्वारे कितीतरी प्रभावी वक्ते किंवा उत्कृष्ट निवेदक तयार होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी लेखक गणेश शेळके यांनी  सांगितले की, मनुष्याच्या अंगी असलेल्या कलामुळे तो मनुष्य सर्वाधिक लोकप्रिय होतो,  छोट्याशा खेड्यात वास्तव्य करीत असतांना शब्दकलेच्या जोरावर मी संपूर्ण जिल्हावासियांमध्ये विविध क्षेत्रातील लोकांमध्ये एक जिव्हाळ्याचे स्थान त्यांच्या हृदयात निर्माण करू शकलो. प्रत्येक मनुष्याने आपल्याजवळ असलेले ज्ञान अथवा कोणतेही कलागुण इतरांना सुद्धा अवगत झाली पाहिजे याकरिता आपण प्रयत्न केला पाहिजे. या पुस्तकाद्वारे एक प्रभावी वक्ता किंवा चांगला निवेदक होण्यासाठी कशाची गरज असते हे विविध प्रकारचे मार्मिक उदाहरणे देऊन सरळ आणि सोप्या भाषेत शब्द मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थी वर्गाला याचा निश्चित फायदा होईल.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सावंत सर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

Previous Post Next Post