विवेकशील समाज निर्मितीसाठी डॅडी देशमुख यांचे कार्य प्रेरणादायी- अविनाश पाटील

 



नितीन फुलझाडे 

अकोला --समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा व व्यसनाधीनता नष्ट केल्यास विवेकी  समाजाची निर्मिती होते. अशा विवेकशील समाज निर्मितीसाठी डॅडी देशमुख यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन  विवेकनामा फाउंडेशनचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले.

              विवेकाधिष्ठित महाराष्ट्राच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असलेल्या सत्यशोधकी कार्यकर्त्यापासून तर वर्तमान तरुणाई सोबत संवाद साधण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी अध्यक्ष अविनाश पाटील अकोल्यात आले असता  प्रशांत देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देऊन  अकोला नगरीचे शिल्पकार स्व. डॅडी देशमुख यांच्या कार्याला अभिवादन केले.जेष्ठ सत्यशोधक कार्यकर्ते महादेवराव भुईभार , वनराईचे बबनराव कानकिरड, प्रदीप हिवाळे बुलढाणा याप्रसंगी उपस्थित होते . 

               भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षापासून विवेक नामा प्रतिष्ठानचे वतीने विवेकनामा नियतकालिक काढून  संविधान मूल्यांची जनजागृती करत असल्याची माहिती त्यांनी दिली. यावर्षीचा विवेकनामा विशेषांक हा ''न्याय '' संकल्पनेवर आधारित असणार आहे. लोकशाहीचे आधारस्तंभ असलेल्या लोकपालिका ,कार्यपालिका, न्यायपालिका, प्रसार माध्यमे आणि जनशक्ती यांची न्यायसंबंधीची भूमिका ,जबाबदारी आणि त्यांचे यशापयश हे या विशेषांकाचे मुख्य विषय सूत्र असणार आहेत. संविधानाला न्याय मिळाला का?  या विषयावर परिसंवाद त्याचबरोबर सामाजिक, राजकीय ,आर्थिक, न्यायासह सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, रोजगार, महिला  क्षेत्रातील न्यायासंबंधी सखोल चर्चा या  विशेषांकातअसणार आहे.  महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी धडपडणाऱ्या  तरुणाई, संशोधक विद्यार्थी , शिक्षकांसाठी विवेकनामा नियतकालिकाचा 'न्याय ' विशेषांक एक पर्वणी ठरणार असल्याचे प्रतिपादन अविनाश पाटील यांनी भेटीदरम्यान केले.

स्व. डॅडी  देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी ललित कला अकादमी व  बाबूजी देशमुख वाचनालय यांचे वतीने शालेय  विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा, अर्थशास्त्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, अर्थशास्त्रातील  तज्ञांचे व्याख्यान व राष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिवल   अशा उपक्रमाचे आयोजन करीत असल्याची माहिती प्रशांत देशमुख यांनी याप्रसंगी दिली.

       अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला स्व. डॅडी देशमुख  विदर्भ स्तरीय कार्यकर्ता पुरस्कार देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

Previous Post Next Post