अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी परिषद गठीत; अंतिम वर्षातील विद्यार्थ्याकडे नेतृत्वाची धुरा

 




चिखली, मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५ (प्रतिनिधी):

अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या एका विशेष बैठकीच्या पार्श्वभूमीवर नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थी प्रतिनिधी परिषदेची (Student Representative Council) स्थापना करण्यात आली आहे. या परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, सामाजिक आणि महाविद्यालयीन गरजांशी संबंधित प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील, तसेच संस्थेच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित केला जाणार आहे. विशेष म्हणजे, या नवगठीत परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांने स्वीकारली आहे.

महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या औपचारिक बैठकीत प्राचार्य डॉ. अरुण नन्हई, प्रा. डॉ. राजेंद्र कोकाटे, प्रा. डॉ. राजेश मापारी यांच्यासह विविध विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सुधारणा, शिस्त आणि अद्ययावत शिक्षण प्रणाली या विषयांवर सखोल चर्चा केली.

या परिषदेच्या स्थापनेपूर्वी इच्छुक विद्यार्थ्यांना आपले विचार आणि योजना मांडण्याची संधी देण्यात आली होती. त्या आधारे त्यांच्या नेतृत्वगुणांची, विचारशैलीची आणि अंमलबजावणी क्षमतेची कसून चाचणी घेण्यात आली. निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखत, ज्या विद्यार्थ्यांनी ठोस आणि संस्थाभिमुख भूमिका मांडली, त्यांचीच निवड विविध प्रतिनिधी पदांसाठी करण्यात आली. या निवडीत, अंतिम वर्षातील विद्यार्थी रोहीत सोनवणे याची सरचिटणीस पदी, क्रिडा प्रतिनिधी पदी हृषीकेश बावस्कर,  तर तृतीय वर्षातील विद्यार्थ्यी यश कर्हाडे यांची सांस्कृतिक प्रतिनिधी पदी तर महिला प्रतिनिधी म्हणून अंतिम वर्षातील गौरी अंबुसकर व N.S.S. प्रतिनिधी म्हणून अनुराग कर्हाडे चा समावेश आहे.

तसेच वर्ग प्रतिनिधि म्हणून अनुक्रमे सोहम वाघ, अतिष जायभाय, रोहित सोनवणे, विवेक पाटील, अमित वटपाळ, आदित्य शिंगणे, प्रथमेश दामधर, रोहीत धनवटे, हृषिकेश थेंग, अलोकरत्न हिवाळे, प्रतिक घोरपडे, अनुज पंडीत, शंकर अस्तारकर, कु. रूतुजा खरात, व कु. गायत्री भोपळे यांचा समावेश आहे.

याप्रसंगी प्राचार्य डॉ. अरुण नन्हई यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थी प्रतिनिधी परिषद ही विद्यार्थ्यांचा आवाज व्यवस्थापनापर्यंत पोहोचवणारी एक महत्त्वाची पायरी आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुणांचा विकास होतो. ही परिषद म्हणजे लोकशाही मूल्यांची रुजवणूक करणारी एक प्रेरणादायी संस्था आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी सध्या शैक्षणिक क्षेत्रातील वेगाने होणाऱ्या बदलांना सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे ही काळाची गरज आहे. प्रतिनिधी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अभिप्रायावर आधारित निर्णय प्रक्रियेला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला.
परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्था संचालित अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी संस्थेचे अध्यक्ष मा. आ. राहुलभाऊ बोंद्रे यांचे विशेष मार्गदर्शन लाभत असून, त्यांनी महाविद्यालयात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे. महाविद्यालयातून सर्वोत्कृष्ट अभियंते घडावेत आणि ते समाजासाठी आदर्श ठरावेत या उद्देशाने संपूर्ण वर्षभर विविध शैक्षणिक उपक्रम जसे की विविध परिषदा, तज्ज्ञांचे व्याख्यान, वेबिनार, प्रकल्प कार्य इत्यादी राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जाणार असून, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात पूर्णवेळ उपस्थित राहणे अत्यंत आवश्यक आहे.


नवगठीत परिषदेचे नेतृत्व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांकडे सोपवण्यात आले असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधित्वाला नवा आयाम मिळाला आहे.

ही विद्यार्थी परिषद केवळ विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यापुरती मर्यादित नसून, महाविद्यालयाच्या एकूण विकास प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा समावेश करणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता, नैतिक मूल्ये, सामाजिक बांधिलकी आणि उद्योजकता या सर्व बाबींना चालना देण्यासाठी परिषद सक्रिय भूमिका बजावेल.

महाविद्यालयात अंमलात आणलेल्या नवीन शिस्तबद्ध प्रणालीबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले असून, त्यांनी याचे स्वागत केले आहे. शैक्षणिक वातावरण अधिक सकारात्मक व शिस्तबद्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात आणि व्यक्तिमत्व विकासात सुधारणा होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शिस्तीच्या या नव्या उपक्रमांमुळे शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यास मदत होत असून, विद्यार्थी अधिक जबाबदारीने महाविद्यालयीन उपक्रमांमध्ये सहभाग घेत आहेत.

कार्यक्रमाच्या शेवटी नवनिर्वाचित प्रतिनिधींना शुभेच्छा देण्यात आल्या आणि पुढील वर्षभर त्यांच्या कार्यातून महाविद्यालयाच्या प्रगतीस हातभार लागेल, असा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला.

Previous Post Next Post