नितीन फुलझाडे
चिखली (उदयनगर): तोरणा गुरूकुल उदयनगर येथे आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकऱ्यांची वेषभूषा साकारून माऊली माऊलीचा जयघोष करीत भावगीते गात पावल्या खेळण्याचा आनंद घेतला. शाळेतील मुलींनी नववारी साडी तसेच तुळस डोईवर घेऊन विठ्ठल रुक्मिणीच्या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला.
यावेळी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितल्या गेले.
सदा माझे डोळा,जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया।
गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्वकाळ!
विठ्ठलाप्रतीची भक्ती, त्याच्या दर्शनाची ओढ आणि त्याच्या कृपेसाठीची याचना ही विठ्ठलभाक्तिची आस वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाच्या परम पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आपोआप घेऊन जाते. वारकऱ्यांना जे सुख पंढरपूरला मिळते तेच सुख या बाल विठ्ठलाच्या लीलांमध्ये शाळकऱ्यांना मिळते असे उदगार शाळेच्या संचालिका सौ. श्रद्धा महाले यांनी काढले.
आषाढी वारी सोहळ्यानिमित्त गावोगावचे हरिभक्त पंढरीची वाट चालत असून आज विठूरायाच्या ओढीने आमचे बाळ विठ्ठल व रुख्मिणी भक्तांचे माहेर असलेल्या पंढरी पांडुरंगाचे साक्षात दर्शन करून देत आहेत असे सौ. श्रद्धा महाले म्हणाल्या. समस्त शाळा व्यवस्थापन, शिक्षक व विद्यार्थ्यांनी सावळ्या परब्रह्माचे मनोभावे दर्शन घेतले. पंढरीत अवघा भवताप निवारतो या संतवचनाची प्रचिती येते. परमात्मा पांडुरंगाच्या भेटीने हृदयात जागणारा भक्तिभाव अवर्णनीय आहे.असे सौ.श्रद्धा महाले म्हणाल्या.
महाराष्ट्रातील बळीराजा सुखी होऊ दे, वारकरी भाविकांच्या मनोकामना पूर्ण होऊ देत, मातृशक्तीला सुरक्षितता, समृद्धी मिळू देत, या बालकांचे जीवन सुख समृद्धी व चैतन्यांनी भरू दे! हि विठुराया चरणी प्रार्थना केल्याचे सौ.श्रद्धा महाले म्हणाल्या
विविध प्रकारची संतांनी रचलेले अभंग, भावगीते टाळ,मृदुंगाच्या तालावर गायन करून तसेच आषाढी एकादशीला महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने वारकरी (भक्त) पंढरपूरला पायी चालत जातात. याला 'वारी' म्हणतात आणि या वारीमध्ये विविध जाती-धर्माचे लोक सहभागी होतात.अशी वारीची माहिती सांगून पावल्या खेळत विद्यार्थी या वैष्णवांच्या सोहळ्यामध्ये रंगून गेले होते, विद्यार्थ्यांनमध्ये आषाढी वारीचे महत्त्व, तसेच भारतीय संस्कृतीचा वारसा रुजवण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. शेवटी सामुहिक पसायदानाने सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी तोरना गुरुकुलच्या प्राचार्य सौ. पठाण व संपूर्ण शिक्षक वर्ग हजर होते.
