शिवाजी महाविद्यालयामध्ये पार पडली व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा...
नितीन फुलझाडे
चिखली :आजच्या वर्तमानकालीन स्थितीमध्ये व्यवसायाभिमुख शिक्षणाची गरज आहे.स्वयंरोजगाराची संधी निर्माण होऊन ग्रामीण दारिद्रय कमी होण्यांस निश्चितच मदत होते. नवनिर्मितीचा ध्यास विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे, आपल्यांत कौशल्य असले पाहिजे, आपण व्यापकदृष्टी ठेवल्यास रोजगाराच्या असंख्य संधी दिसून येतात. व्यवसाय व स्वयंरोजगार विद्यार्थ्यांनी समजून घेण्याचे आवाहन आहे. स्वयंरोजगार करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. व्यवसायात चढ उतार असतो. यातून रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होते. त्यामुळे आर्थिक सक्षमीकरण होत असते. आणि घरातही मानाचे स्थान मिळते, स्वतःचा आत्मविश्वासही वाढतो.अशा शब्दांमध्ये चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले यांनी विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे महत्व समजावून सांगितले.
आज चिखली येथे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा व श्री शिवाजी कला व विज्ञान महाविद्यालय, चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन सत्र, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नोंदणी मार्गदर्शन व प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माननीय सौ श्वेताताई महाले पाटील उदघाटनीय भाषणात बोलत होत्या.
पुढे बोलतांना आ. सौ. श्वेता महाले म्हणाल्या की,बेरोजगारीमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. बेरोजगारी कमी करण्यासाठी कौशल्य विकासाने स्वयंरोजगार निर्माण करावे. नवीन पिढींनी स्वतःला स्वयंरोजगारासाठी तयार केले पाहिजे कारण नोकरी ही सर्वांनाच मिळेल असे नाही, यासाठी कौशल्य, माहिती, भांडवल आणि जिद्द हया बाबी आत्मसात करण्याची गरज आहे.
यावेळी उपस्थिताना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची तसेच विविध आर्थिक विकास महामंडळाची माहिती देण्यात आली. रोजगार स्वयंरोजगार याबाबत मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्य विकास अधिकारी श्रीपाद परळीकर यांनी केले, महाविद्यालयाच्या प्राचार्य यांनी उमेदवारांना कौशल्य रोजगाराच्या महत्त्वबाबत मार्गदर्शन केले. आ. सौ श्वेताताई महाले यांनी यावेळी उपस्थित यांना शासकीय योजनांची माहिती, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची माहिती व तालुक्यातील युवकांनी जास्तीत जास्त राज्यसरकार द्वारे राबवल्या जाणाऱ्या कौशल्य, रोजगार संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजना मधे मिळणाऱ्या लाभाबाबत मार्गदर्शन केले.
सदरील कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक डॉ पी. पी. पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक एस. एन. पवार यांनी केले.यावेळी , श्री मधुकरराव पाटील (आजीवन सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती),बी.बी बेदरकर प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिखली, संजय गाडेकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे पुरुषोत्तम अंभोरे, जिल्हा उद्योग केंद्राचे कैलास खराटे, श्री शिवाजी कला व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य वनिता पोचछी मॅडम, कौशल्य विकास अधिकारी श्रीपाद परळीकर, कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी संतोष पडघान, शुभम पवार जिल्हा समन्वयक उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने रोजगार इच्छुक उमेदवारांची उपस्थिती होती.

