नितीन फुलझाडे
चिखली (दि. १७ जुलै २०२५): आजची तरुण पिढी अतिशय बुद्धिमान आहे, मात्र कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. मेहनतीची सवय अंगीकारून अपयशाकडे संधी म्हणून पाहा, असा मौलिक सल्ला विद्यार्थ्यांना देत या संस्थेने मला घडवलं. आज संस्थेची झालेली सर्वांगीण प्रगती पाहून मी भारावून गेलो आहे. शिक्षण, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्था घेत असलेल्या प्रयत्नांमुळे मला प्रचंड अभिमान वाटतो. माझ्या परीने मी संस्थेला सर्वतोपरी मदत, मार्गदर्शन व सहकार्य देण्यासाठी नेहमी तत्पर आहे असे प्रतिपादन राकेश शर्मा यांनी केले.
स्थानिक अनराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय चिखली येथील संगणक अभियांत्रिकी विभागाच्या २००१ च्या बॅचतील माजी विद्यार्थी राकेश शर्मा यांनी आज महाविद्यालयात सदिच्छाभेट दिली असता महाविद्यालयाच्या वतिने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या आगमनानिमित्ताने महाविद्यालयाने विशेष संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुण नन्हई सर तर प्रा. सरिता सावळे मॅडम (अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघटना) यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती. सदर संवाद सत्र विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी पर्व ठरले.
सध्या Accenture या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपनीत Senior Manager या पदावर कार्यरत असलेले श्री. शर्मा यांनी Deloitte व KPMG या नामांकित कंपन्यांमध्येही यशस्वी कारकीर्द राहिली आहे. India-US Corridor या महत्त्वपूर्ण प्रकल्पात त्यांनी ११२% महसूलवाढ साधत उत्कृष्ट नेतृत्वाचे उदाहरण सादर केले आहे. तसेच तीन यशस्वी फ्रँचायझी व्यवसायांचे संचालन व Harvard Business School येथून घेतलेले Leadership & Management Essentials चे प्रमाणपत्र यामुळे त्यांची कारकीर्द अधिक उज्वल ठरली आहे.
प्राचार्य डाॅ. अरूण नन्हई यांनी शर्मा यांचे मन:पूर्वक स्वागत करत महाविद्यालयाच्या अलीकडच्या शैक्षणिक व भौतिक प्रगतीची थोडक्यात माहिती दिली.
यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला तर महाविद्यालयासाठी गौरवाचा आणि सन्मानाचा क्षण असून शर्मा यांचे यश आणि त्यांचे संस्थेविषयीचे प्रेम हे खरंच अनुकरणीय असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचलन व आभार डॉ. पी. एस. गावंडे यांनी दिलखुलास शब्दांत केले.

