नितीन फुलझाडे
: महाराष्ट्रातील राजपूत समाज हा एक महत्त्वाचा आणि गौरवशाली इतिहास असलेला समाज आहे. मराठा समाजात एकरूप होऊनही, त्यांनी आपली ओळख टिकवून ठेवली आहे.राजपुत समाजाचा विकास होण्यासाठी या समाजातील युवक, युवतींना भरीव पाठबळ देणे आवश्यक असून वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळास सद्य स्थितीत देण्यात आलेले 50 कोटी रुपये. चे भांडवल अतिशय कमी असून या महामंडळाला 200 कोटी रु. भाग-भांडवल द्यावे, अशी आग्रही मागणी आज चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले यांनी विधिमंडळात केली.
राजपुत समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी आ. सौ. श्वेता महाले यांनी जुलै 2023 च्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यानंतर त्यांनी सातत्याने या महामंडळाच्या स्थापनेसाठी पाठपुरावा करत वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापनेस 23 सप्टेंबर 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळवून दिलेली आहे.
राजपूत समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील युवक, युवतींना शैक्षणिक तसेच व्यवसायासाठी आर्थिक साहाय्य करण्यासाठी हे महामंडळ घोषित केलेले आहे.
या महामंडळास 50 कोटींचे आर्थिक भाग भांडवल देण्यात येणार असल्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. परंतु राजपूत समाज हा महाराष्ट्रभर मोठ्या संख्येने आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात युवक, युवती बेरोजगार आहेत, म्हणूनच 50 कोटींचे आर्थिक भाग-भांडवल 200 कोटी करण्यात यावे आणि राजपुत समाजातील युवक, युवतींना न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी आज औचित्याच्या मुद्द्याद्वारे आ. सौ. श्वेता महाले यांनी विधिमंडळात केली.
