नितीन फुलझाडे
डोंगरख़ंडाळा -
येथील श्रीमती बसंतीबाई देवकीसनजी चांडक सहकार विद्या मंदिर डोंगर खंडाळा येथे दि.19 जुन 2025 रोजी राधेश्याम चांडक उपाख्य भाईजीं यांच्या प्रेरणेतून, डॉ.सुकेश झंवर व सौ.कोमल झंवर यांच्या मार्गदर्शनाने 2300 वृक्ष वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे | वनचरे || या संत शिरोमणी तुकोबारायांच्या ओविंना सार्थ ठरवीत . राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांची संकल्पना *"वसुंधरा" आम्ही तुझे अपराधी..* यामाध्यमातून
*2300 देसी वृक्ष* ज्यामध्ये वड, पिंपळ, लिंब , जांभूळ, चिंच , आंबा, सीताफळ व इतर वृक्ष वाटप करण्यात आले. राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी बुलडाणा अर्बनच्या माध्यमातून मागील दोन दशकांपासून वृक्ष लागवडीचा पावन विचार सर्वत्र राबवित आहेत.
वृक्षरोपणच नव्हे तर वृक्ष संवर्धनाचे अनेक सामाजिक उपक्रम बुलडाणा अर्बन परिवाराद्वारे दरवर्षी सातत्याने राबविले जातात.
वड, पिंपळ, औषधी वनस्पती, फळझाडे, अशा देशी व उपयोगी झाडांच्या रोपांमुळे शाळा परिसरात जणू छोटेखानी वननिर्मितीच झाली. प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड देऊन "झाड दत्तक घ्या, ते वाढवा" असा संकल्प देण्यात आला.
सौ.कोमल झंवर यांची प्रतिक्रिया "आज एक झाड लावले, तर उद्या तीच छाया आपल्या पिढ्यांना संरक्षण देईल. पर्यावरण हा अभ्यासाचा विषय नसून, तो जगण्याची शैली बनवली पाहिजे."
"एक मूल – एक रोप" या विचारातून हिरवळ निर्माण करण्याचा स्तुत्य उपक्रम इको क्लबच्या माध्यमातुन राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी तयार केलेले "हिरवी शपथ" पत्र, ज्यावर त्यांनी स्वाक्षरी करून झाड जगवण्याची जबाबदारी घेतली. यावेळी अनेक पालकही उपस्थित होते. त्यांनी शाळेच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
“सहकार विद्या मंदिराने खऱ्या अर्थाने ‘हरित क्रांती’ची मुहूर्तमेढ रोवली आहे अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी दिली.
या वृक्ष वाटप कार्यक्रमाच्या वेळी याप्रसंगी स्थानिक संचालक श्री. अनंतराव सावळे ,बबनराव उजेड ,बबनलालाजी गाडगे, व इतर संचालक मंडळ, तसेच बुलढाणा अर्बनचे विभागीय व्यवस्थापक श्री. राजेंद्र वानेरे, शाखा व्यवस्थापक अनिल देशपांडे, बुलढाणा अर्बन टेक्स्टाईल मिलचे संपत यादव, संतोष शिंदे उपस्थित होते व कार्यक्रमाच्या यशस्वी ते करीता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाघमारे, मुख्याध्यापक सतीश रोढे, प्राध्यापक,शाळेचे शिक्षक वृंद, इतर सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
