मुस्लिम कब्रस्तानच्या भिंतीच्या पुनर्बांधणीसाठी मा.नगरसेवक आसिफ भाई मित्र मंडळच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर

 




चिखली / प्रतिनीधी : यावर्षी पावसाळ्याची जोरदार सुरुवात झाली असली, तरी या पावसाने सिद्धार्थ नगर प्रभाग क्रमांक ९ मधील मुस्लिम कब्रस्तानच्या भिंतीच्या नाजूक अवस्थेकडे चिखलीकरांचे लक्ष वेधले आहे. पहिल्याच पावसात कब्रस्तानची भिंत कोसळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. कब्रस्तानच्या या भिंतीच्या पडझडीमुळे मोकाट जनावरे कब्रस्तानात शिरत असून, यामुळे कबरींची विटंबना होत आहे. या संदर्भात मा.नगरसेवक आसिफ भाई यांच्या मार्गदर्शनात आसीफ भाई मित्र मंडळ इंदिरा नगरच्या वतीने सोमवार ३० जून रोजी नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करून लवकरात लवकर संरक्षक भिंत बांधण्याची मागणी केली आहे.

प्रभाग क्रमांक ९ मधील मुस्लिम कब्रस्तानची भिंत ही गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्थेत होती. स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही याबाबत तक्रारी केल्या होत्या, परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. पहिल्याच पावसात भिंत कोसळल्याने या दुर्लक्षाचा परिणाम समोर आला आहे. भिंतीच्या कमकुवत बांधकामामुळे आणि देखभालीच्या अभावामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

भिंत पडल्यामुळे कब्रस्तानात मोकाट जनावरे सहज प्रवेश करत असून, यामुळे कबरींची विटंबना होत आहे. यामुळे मुस्लिम समुदायात तीव्र नाराजी पसरली आहे. कब्रस्तान हे धार्मिक आणि भावनिक दृष्ट्या अत्यंत पवित्र स्थळ असून, अशा प्रकारच्या विटंबनेमुळे स्थानिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मा.नगरसेवक मोहम्मद आसिफ भाई यांच्या मार्गदर्शनात आसीफ भाई मित्र मंडळ इंदिरा नगरच्या सदस्यांच्या मार्फत नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात त्यांनी मुख्याधिकारी महोदयांना तातडीने कब्रस्तानच्या भिंतीचे बांधकाम करण्याची मागणी केली आहे. कब्रस्तानच्या भिंतीची त्वरित दुरुस्ती करणे आवश्यक आहे, जेणेकरून पुढील विटंबना टळेल आणि नागरिकांच्या धार्मिक भावनांचा आदर राखला जाईल,  तसेच, या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी भक्कम आणि टिकाऊ भिंत बांधण्याची मागणीही त्यांनी या निवेदना द्वारे केली आहे. भिंतीच्या पुनर्बांधणीबरोबरच कब्रस्तानाच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणीही केली आहे. यामध्ये कब्रस्तान परिसरात मोकाट जनावरांचा प्रवेश रोखण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याची मागणी सुध्दा केली आहे.

निवेदन देतेवेळी आसीफ भाई मित्र मंडळ इंदिरा नगरचे सर्व सदस्य, तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post