"स्वायत्ततेची दिशा हे गुणवत्तेच्या शिक्षणाचे प्रतिबिंब" – मा.आ. राहुलभाऊ बोंद्रे

 




अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक विकास कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न




पाच दिवस, बारा सत्रे आणि एक उद्दिष्ट: शैक्षणिक स्वायत्ततेसाठी पुढचे पाउल



चिखली (प्रतिनिधी) दिनांक: २३ जून २०२५ ; स्वायत्तता म्हणजे केवळ अधिकारांची वाटणी नव्हे, तर शिक्षणसंस्थेच्या जबाबदारीची जाणीव आणि गुणवत्ता केंद्रित कार्यसंस्कृतीचा स्वीकार असून  शैक्षणिक निर्णय स्वायत्ततेखाली घेतले जात असल्याने, अभ्यासक्रम रचना, मूल्यमापन प्रक्रिया, विद्यार्थ्यांचा व्यावसायिक विकास आणि उद्योगांशी समन्वय हे सर्व घटक प्रभावीपणे अंमलात आणता येतात. प्रत्येक प्राध्यापकाने या प्रक्रियेमध्ये आपली भूमिका समजून घेत, नवोन्मेषी दृष्टिकोन ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे, अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान  महाविद्यालय शैक्षणिक उत्कृष्टतेच्या दिशेने आगेकूच करत असून, भविष्यात हे महाविद्यालय 'स्वायत्त आणि नाविन्यपूर्ण शिक्षणसंस्कृती'चे उदाहरण ठरेल, असा आत्मविश्वासही परमहंस रामकृष्ण मौनिबाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ राहुलभाउ बोंद्रे यांनी व्यक्त केला. ते प्राध्यापकांकरिता  विकास कार्यक्रमाच्या आयोजित समारोपप्रसंगी बोलत होते.

त्यांच्यासोबत संस्थेचे कोषाध्यक्ष सिध्देश्वर वानेरे, कार्यकारी संचालक डाॅ. रविंद्र इंगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण नन्हई, डाॅ. राजेंद्र कोकाटे, डाॅ. राजेश मापारी, डाॅ. पी. एस. गावंडे आदी मान्यवरांचीही उपस्थिती होती.
  अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात दिनांक १७ ते २१ जून २०२५ दरम्यान प्राध्यापक विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, “संस्थात्मक स्वायत्ततेसाठी प्राध्यापकांना सक्षम करणे” या प्रमुख उद्दिष्टावर आधारित या कार्यक्रमात पाच दिवसांमध्ये १२ सत्रे पार पडली. या कार्यक्रमात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, स्वायत्ततेची प्रक्रिया, तणाव व्यवस्थापन,  विद्यापीठ पद्धतीतील बदल, तसेच प्राध्यापकांची जबाबदारी आणि संधी यांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यकारी संचालक डाॅ. रविंद्र इंगळे म्हणाले की स्वायत्तता ही केवळ शैक्षणिक निर्णयस्वातंत्र्याची प्रक्रिया नसून ती संस्था, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीची ग्वाही आहे असे ते म्हणाले. संस्थेचे प्राचार्य डॉ.अरूण नन्हई यांनी, सांगितले की, अभ्यासक्रमात लवचिकता, उद्योगाभिमुख उपक्रम, संशोधनाची दिशा आणि विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढवणे या सगळ्यांसाठी स्वायत्तता अत्यावश्यक आहे. प्राध्यापकांनी सकारात्मक दृष्टिकोन, नवोन्मेषी विचार आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक क्षमतांचे विकास करण्यावर भर द्यावा, समारोप प्रसंगी असे सांगितले.

 कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संपूर्ण महाविद्यालयीन टीमचे विशेष कौतुक करण्यात आले.
ही कार्यशाळा हे स्वायत्ततेच्या दिशेने निश्चित टाकलेले एक भक्कम पाऊल ठरले असून, येणाऱ्या काळात अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय "शैक्षणिक उत्कृष्टता आणि नाविन्यपूर्ण शिक्षणसंस्कृती" साकारत पुढे जाईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
सदर कार्यक्रमाचे संचलन प्रा. अक्षय पाटील यांनी तर आभार डाॅ. पि. एस . गावंडे यांनी व्यक्त केले.


Previous Post Next Post