तुमचा पक्षकार आणि भारतीय मतदार यांचे हित सर्वोच्च... आ. सौ. श्वेताताई महाले..
नितीन फुलझाडे
चिखली:- गेल्या पन्नास-साठ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न- चिखली येथे उपविभागीय कार्यालय स्थापन करण्यात यावे किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालयाची एक सीटिंग चिखली येथे असावी. योगायोगाने चिखली वकील संघामार्फत हा प्रश्न चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार विकास कन्या सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या कानावर टाकल्या जातो, वकील संघाने जनतेची गाऱ्हाणी व कष्ट दूर व्हावे म्हणून केलेली ही मागणी रास्त असल्याने चिखलीतील महसुली प्रकरणांची सुनावणी उपविभागीय अधिकारी यांनी चिखली येथे येऊन करावी, असे पत्र आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाते. आणि अवघ्या आठ दिवसाच्या आत राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे हे चिखली येथील महसुली प्रकरणांची सुनावणी चिखली येथेच घेण्यात यावी यासंबंधी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना आदेशित करतात. हे सगळे स्वप्नवत असून 35 वर्षांपूर्वी अशी सुनावणी एकदा सुरू झाली होती आणि आज आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्याने पुन्हा एकदा चिखली न्यायालय परिसराला हा सोन्याचा दिवस दिसला आहे. असे उद्गार एडवोकेट श्री कस्तुरे यांनी चिखली वकील संघाच्या वतीने आमदार श्वेता ताई महाले पाटील यांचा सत्कार करताना काढले.
दिनांक 25 जून पासून चिखली येथील महसुली प्रकरणांची सुनावणी चिखली तहसील कार्यालयात घेण्यासंदर्भात वेळापत्रक उपविभागीय अधिकारी यांच्याकडून चिखली वकील संघाला पाठवण्यात आले. आणि चिखली न्यायालयीन परिसरामध्ये सगळ्यांच्या आनंदाला अगदी उधाण आले.
या संदर्भात पार्श्वभूमी अशी ही चिखली वकील संघाने चिखलीतील वकील आणि चिखली परिसरातील नागरिकांना सोयीचे व्हावे म्हणून चिखली तालुक्यातील महसुली प्रकरणांची सुनावणी उपविभागीय अधिकारी यांनी आठवड्यातून दोन दिवस देऊन चिखली तहसील कार्यालयातच घ्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या या मागणीला आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी समर्थन दिल्याने एक वेगळे महत्त्व निर्माण झाले. आणि त्यावर कार्यवाही करताना अगदी आठ दिवसात निर्णय होऊन चिखली वकील संघाची मागणी मान्य झाली. त्यामुळे चिखली वकील संघामार्फत अतिशय तत्परतेने चिखली वकील संघाची मागणी सरकार दरबारी पोहोचवणाऱ्या आमदार श्वेता ताई महाले पाटील व या मागणीला मंत्रालय स्तरावरून आवश्यक तरतुदी करून पूर्णत्वास आणणाऱ्या श्री विद्याधर जी महाले (माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव) यांचा सत्कार आयोजित केला होता.
चिखली तालुक्यातील वैधानिक समस्यांची निगडित माननीय उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय चिखली येथे मिळवून दिल्याबद्दल प्रमुख पाहुणे म्हणून श्री विद्याधर जी महाले तर सत्कार मूर्ती म्हणून आमदार सौ श्वेता ताई महाले यांचा सत्कार चिखली वकील संघामार्फत करण्यात आला. या कार्यक्रमाला चिखली वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट सोनाळकर यांनी प्रमुख पाहुणे श्री विद्याधर जी महाले यांचा सत्कार केला तसेच आमदार सौ श्वेता ताई महाले यांचा सत्कार श्रीमती भंडारे, श्रीमती कुटे व श्रीमती पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी एडवोकेट कस्तुरे यांनी अतिशय भावनिक प्रास्ताविक सादर केले, आणि आपल्या प्रस्तावनेतच चिखली येथे उपविभागीय अधिकारी स्थायी पद देण्यात यावे व चिखली येथे दिवाणी वरिष्ठ न्यायालय सुद्धा सुरू करण्यात यावे अशा मागण्या दोन्ही सत्कारमूर्तींकडे केल्या.
चिखली वकील संघामार्फत करण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देताना श्री विद्याधर जी महाले यांनी "लोकशाहीच्या विकासाची फळे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजेत, यासाठी सरकार नेहमीच कार्यरत असते. आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी पाठपुरावा करून मंजूर करून घेतलेल्या उपविभागीय अधिकारी बेंच सीटिंग मुळे अनेक नागरिकांचे आर्थिक मानसिक शारीरिक असे सर्व प्रकारचे श्रम वाचणार आहे. त्यामुळे भारतीय संविधानाकडून जनतेला अपेक्षित असलेली पारदर्शकता व सर्व घटकांचा संतुलित विकास या गोष्टी साध्य होणार असल्याचे ते म्हणाले.
आमदार श्वेता ताई महाले पाटील या आपल्या सत्काराला उत्तर देताना तुमचा पक्षकार हा देशाचा मतदार असून त्याची गैरसोय होऊ नये यासाठी देशाच्या कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायव्यवस्था यांनी नेहमी प्रयत्न केले पाहिजे. याच प्रयत्नातून चिखलीच्या न्यायव्यवस्थेने केलेली रास्त मागणी कार्यकारी मंडळापर्यंत पोहोचवून ती तत्परतेने मान्य करून घेता आली ही मी माझे भाग्य समजते. काही तांत्रिक कारणामुळे चिखली न्यायालयाची अद्ययावत व सुसज्ज इमारत मागील कार्यकाळात पूर्ण करता आली नाही, परंतु आता सुमारे 55 कोटी रुपये एवढी किंमत असलेली अतिशय अद्यायावत, सुसज्ज लायब्ररी असलेली आणि महाराष्ट्रातील लोक जिथे एक आदर्श नमुना म्हणून ही इमारत पाहायला येतील अशी न्यायपालिकेची इमारत उभारण्याचा आपला मानस असून ही तरतूद करण्यासंबंधी आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती केली आहे, व त्यांनीही याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. असेही आमदार सौ श्वेताताई महाले पाटील म्हणाल्या.
याप्रसंगी एडवोकेट संजीव सदार यांची तिसऱ्यांदा भाजपा वकील सेलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाला राजकीय अतिथी म्हणून चिखली भाजपाचे अध्यक्ष डॉक्टर कृष्णकुमार सपकाळ चिखली, भाजपा शहराध्यक्ष श्री सागर पुरोहित, गटविकास अधिकारी श्री गजानन पोफळे, श्री सुहास शेटे माजी नगर अध्यक्ष, एडवोकेट मंगेश व्यवहारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री शंतनु बोंद्रे व श्री मनोज दांदडे, एडवोकेट कराडे,एडवोकेट गवई आणि अन्य वकील मंडळी उपस्थित होते.



