नितीन फुलझाडे
चिखली:- दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले जयंती उत्सव समिती(माळी समाज संगठन, चिखली शहर) यांच्यावतीने क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांची जयंती शुक्रवार दि.11 एप्रिल रोजी चिखली शहरात भव्य शोभायात्रा व मोटरसायकल रॅली काढून साजरी करण्यात येणार आहे.
स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण, अस्पृश्यता व जातीव्यवस्थेचे निर्मूलन, सामाजिक प्रबोधन, जातीविरोधी समाज सुधारक, लेखक, यशस्वी उद्योजक असे बहुआयामी व्यक्तिमत्व क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांची 198 वी जयंती शुक्रवार दि. 11 एप्रिल 2025 रोजी चिखली शहरात विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात येणार आहे.
उत्सव समितीतर्फे वर्षभर समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात येत असतात. यामध्ये प्रामुख्याने शिक्षण प्रसार मिशन अंतर्गत आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शालेय मदत करणे असो व दहावी बारावी, उच्च शिक्षण व शालेय शिक्षणामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्कार देऊन समितीद्वारे सत्कार करण्यात येतो.
क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले जयंतीदिनी शुक्रवार दि. 11 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता स्थानिक जुनेगाव चिंचपरिसरातील जागृती महिला अर्बन येथून भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी ठीक 5.00 वाजता श्री संत सावता माळी भवन चिंच परिसर येथून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तर या शोभायात्रेचा समारोप जयस्तंभ चौकातील अशोक वाटीकेत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन करण्यात येणार आहे. तरी सर्व समाज बांधवांनी, नागरिकांनी व महात्मा जोतीराव फुले यांच्यावर प्रेम करणार्या सर्वांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले जयंती उत्सव समिती(माळी समाज संगठन, चिखली शहर)यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Tags
जयंती उत्सव...