चिखली येथे प्रभू विश्वकर्मा प्रगटदिन व उद्योगदिन उत्सवाचे आयोजन


- आ. श्वेताताई महाले पाटील यांची लाभणार उपस्थिती
- प्रभू विश्वकर्मा पूजन, शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजन
- खेळ पैठणीचा स्पर्धेतील विजेच्या महिलांना पैठणीचे वाटप

चिखली - सृष्टीचे रचियता प्रभू विश्वकर्मा यांच्या सोमवार (दि.१०) प्रगटदिनानिमित्त चिखली येथील विश्वकर्मा बहुउद्देशिय सेवा समितीच्यावतीने श्री विश्वकर्मा प्रगटदिन व उद्योग दिन उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या सोहळ्यास चिखलीच्या लोकप्रिय आमदार श्वेताताई विद्याधर महाले पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सालाबादाप्रमाणे वायझडी तलावाजवळील खंडाळा रोडवरील प्रभू विश्वकर्मा मंदीर येथे हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी खेळ पैठणीचा स्पर्धेतील विजेत्या महिला, भगिनींना पैठणीचेही आ. श्वेताताई महाले यांच्याहस्ते वाटप केले जाणार आहे.

सुतार समाजाचे नेते तथा प्रभू विश्वकर्मा बहुउद्देशिय सेवा समितीचे अध्यक्ष मुकेश सुरूशे यांनी सांगितले, की दरवर्षी सुतार समाजाच्यावतीने प्रभू विश्वकर्मा मंदीर येथे श्री विश्वकर्मा प्रगटदिन सोहळा साजरा केला जातो. या सोहळ्यास सुतार समाज बांधवांसह प्रभू विश्वकर्मा दैवत असलेल्या समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते. यावर्षीदेखील प्रभू विश्वकर्मा प्रगटदिनाच्या निमित्ताने सोमवारी (दि.१०)  श्री विश्वकर्मांच्या मंदीरस्थळी प्रगटदिन व उद्योग दिन सोहळा साजरा होत आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता यज्ञ व पूजा आयोजित असून, सकाळी १० वाजता शोभा यात्रा तसेच चिखली शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. तसेच, दुपारी १२ वाजता चिखली मतदारसंघाच्या विकासकन्या व आमदार श्वेताताई महाले पाटील यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी खेळ पैठणीचा या सांस्कृतिक कार्यक्रमातील विजेच्या महिला-भगिनींना आ. श्वेताताईंच्याहस्ते पैठणी भेट दिली जाणार आहे. दुपारी तीन वाजता भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर हळदी-कुंकू समारंभ होणार आहे. तरी, या सोहळ्याला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सुतार समाजाचे नेते मुकेश सुरूशे यांनी केले आहे.
Previous Post Next Post