पत्रकार इफ्तेखार खान यांच्या कन्येचा गौरव
चिखलीची लेक उंच भरारीला सज्ज...
कु. तंजिला इफ्तेखार खान किर्गिझस्तानमध्ये करणार एमबीबीएस, तालुका पत्रकार संघाकडून अभिनंदन
चिखली : जिद्द, मेहनत आणि पालकांचा भक्कम पाठिंबा असेल तर कोणतेही स्वप्न दूर नसते, हेच सिद्ध केले आहे चिखली तालुका पत्रकार संघाचे सदस्य इफ्तेखार खान यांची कन्या कु. तंजिला इफ्तेखार खान हिने. वैद्यकीय शिक्षणासाठी तिची किर्गिझस्तान येथील नामांकित महाविद्यालयात निवड निश्चित झाली असून, लवकरच ती उच्च शिक्षणासाठी परदेशाकडे रवाना होत आहे.
सामान्य कुटुंबातून आलेल्या तंजिलाचे लहानपणापासूनच ध्येय स्पष्ट होते - डॉक्टर व्हायचे. केवळ स्वप्न न पाहता तिने सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. पाच वर्षांच्या एमबीबीएस अभ्यासक्रमासह एफएमजीई परीक्षेची तयारी असा तिचा एकूण शैक्षणिक प्रवास असणार आहे.
या यशाचे औचित्य साधून चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने नुकताच तंजिलाचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी तिचे वडील इफ्तेखार खान (राजा खान) यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, "माझ्या मुलीचे ध्येय पहिल्यापासूनच वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचे होते. आजच्या पिढीतील मुली शिक्षणाबाबत अत्यंत जागरूक आहेत. मुलांच्या बरोबरीने मुलीही उच्च शिक्षण घेत आहेत, ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे."
ते पुढे म्हणाले, "आज तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे. पालकांना आपल्या पाल्याच्या सुरक्षिततेबाबत वेळोवेळी माहिती मिळत असते. त्यामुळे मुलींना देशातच नव्हे, तर परदेशातही शिक्षणासाठी पाठवण्याचा विश्वास पालकांमध्ये निर्माण झाला आहे. किर्गिझस्तान वैद्यकीय शिक्षणात आघाडीवर असून, तेथील विद्यापीठांमध्ये उच्च तंत्रज्ञान आत्मसात केलेले आहे. पूर्ण चौकशी आणि समाधान झाल्यानंतरच आम्ही हा निर्णय घेतला."
हजारो किलोमीटर साता समुद्रापार दूर मुलगी पहिल्यांदाच जात असल्याने सुरुवातीला थोडी चिंता होती, मात्र तंजिलाची मानसिक तयारी आणि कुटुंबाचे प्रोत्साहन यामुळे तिने आत्मविश्वासाने परदेशी शिक्षणाचा निर्णय घेतला. तसेच चिखली येथील NEET व JEE व्हिजन इन्स्टिट्यूट च्या शिक्षकांनी घेतलेल्या विशेष परिश्रमाने ही ध्येय गाठता आले असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, भारतात असो वा परदेशात, एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर वैद्यकीय व्यवसायासाठी एफएमजीई ही पात्रता परीक्षा आता सर्वांसाठी अनिवार्य करण्यात आली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
तंजिलाच्या या दैदिप्यमान यशाबद्दल चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने तिला भावी शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
इफ्तेखार खान यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले, "पत्रकार संघाने माझ्या मुलीचा सत्कार करून तिचे मनोबल वाढवले आहे. त्यांच्या सहकार्याबद्दल मी सर्व सदस्यांचा मनस्वी आभारी आहे."
तंजिलाची ही भरारी केवळ तिच्या कुटुंबापुरती मर्यादित नसून, उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या असंख्य विद्यार्थिनींसाठी, विशेषतः मुलींना शिकवण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक पालकासाठी ती एक प्रेरणादायी दीपस्तंभ ठरली आहे.
या वेळी चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन फुलझाडे, उपाध्यक्ष भिकू लोळगे, सचिव महेश गोंधणे, संतोष लोखंडे, रेणुकादास मुळे, इफ्तेखार खान,रवींद्र फोलाने, सत्य कुटे, कमलाकर खेडेकर, रमीज राजा,सय्यद साहिल,भारत जोगदंडे उपस्थित होते.
