Khabarbat News-चिखलीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत १ व २ ऑक्टोबरला विविध उपक्रम; नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन



नितीन फुलझाडे 

चिखली - केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नगर परिषद, चिखलीच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत शहरात दि. १ व २ ऑक्टोबर २०२६ रोजी विविध जनजागृतीपर कार्यक्रम आणि स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.


हे सर्व उपक्रम चिखली शहराचे लाडके नगराध्यक्ष *मा. पंडितदादा देशमुख* यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्याधिकारी व नगर परिषदेच्या सर्व प्रमुख पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत.


१ ऑक्टोबर : ‘एक तास श्रमदान’ मोहीम

दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या मुख्य मार्गावर “एक तास श्रमदान” या विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत चौक, मुख्य रस्ता तसेच उद्यान परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात येणार आहे.


२ ऑक्टोबर : गांधी जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम

दि. २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगर परिषदेच्या वतीने पुढील कार्यक्रम होतील -

१) सकाळी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन.

२) शहरात स्वच्छतेचा जागर करण्यासाठी भव्य ‘स्वच्छता जनजागृती वाहन रॅली’.

३) शहर स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी ‘स्वच्छता शपथ’ व ‘हरित शपथ’.

४) देशसेवा बजावलेल्या माजी सैनिकांचा ‘सन्मान पत्र’ देऊन सत्कार.


चिखलीकरांना जाहीर आवाहन

“आपले शहर स्वच्छ, सुंदर, आरोग्यदायी आणि हरित ठेवणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर आपल्या प्रत्येक चिखलीकराची नैतिक जबाबदारी आहे. स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी यासाठी १ ऑक्टोबरच्या ‘एक तास श्रमदान’ उपक्रमात आणि २ ऑक्टोबरच्या वाहन रॅली व जनजागृती कार्यक्रमात चिखली शहरातील सर्व व्यापारी बांधव, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, तरुण मंडळे, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी व सुजाण नागरिकांनी कोणत्याही पक्षा-गटाच्या पलीकडे जाऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहन नगर परिषद, चिखलीच्या वतीने करण्यात आले आहे.



Previous Post Next Post