बुलढाणा : “मुख्यमंत्रीपदी राज्याचे आवडते देवाभाऊ असल्यामुळेच तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी आज निर्भीडपणे आणि कोणत्याही दबावाशिवाय काम करू शकत आहेत,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव तथा मंत्रालयातील सहसचिव दर्जाचे वरिष्ठ अधिकारी श्री. विद्याधरजी महाले यांनी केले. महाराष्ट्राच्या विकासासाठी सक्षम नेतृत्वासोबतच अधिकाऱ्यांना पारदर्शक आणि निर्भीडपणे काम करण्याचे स्वातंत्र्य मिळणे आवश्यक असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात हे वातावरण निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव श्री. विद्याधरजी महाले यांच्या ५०व्या वर्षातील पदार्पणानिमित्त बुलढाणा शहरात आयोजित भव्य अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला सत्कारमूर्ती श्री. विद्याधरजी महाले, पदवीधर विधान परिषद सदस्य आमदार धीरज लिंगाडे, चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील, बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धृपतरावजी सावळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. किशोर बिडवे यांनी केले.
या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने चिखली व बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील रुग्णांच्या सेवेसाठी अत्याधुनिक कार्डिओलॉजिकल ॲम्बुलन्सचे लोकार्पण करण्यात आले. तसेच श्री. विद्याधर महाले साहेब मित्रमंडळाच्या वतीने सहकार विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. त्यामुळे वाढदिवसाचा हा सोहळा सत्कारापुरता मर्यादित न राहता आरोग्यसेवा आणि शिक्षणाला हातभार लावणाऱ्या सामाजिक उपक्रमांचा केंद्रबिंदू ठरला.
‘विद्याधर महाले यांच्या कर्तृत्वाचा लाभ बुलढाण्याला होणार’
कार्यक्रमातील भाषणांचा प्रारंभ माजी आमदार धृपतरावजी सावळे यांनी केला. त्यांनी विद्याधर महाले यांच्या जीवनप्रवासाचा आणि कर्तृत्वाचा आढावा घेत त्यांच्या प्रशासकीय कार्याचा गौरव केला. प्रतिकूल परिस्थितीतही ध्येय, शिस्त आणि कार्यक्षमता यांची सांगड घालत त्यांनी प्रशासकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे सावळे यांनी नमूद केले.
“विद्याधर महाले यांच्यासारखी व्यक्ती राज्याच्या प्रशासनातील महत्त्वाच्या ठिकाणी कार्यरत असणे ही बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या अनुभवाचा, संपर्काचा आणि कार्यक्षमतेचा उपयोग जिल्ह्यातील विकासकामांना निश्चितच होऊ शकतो. बुलढाण्याच्या प्रश्नांची जाण असलेला आणि प्रशासनाच्या सर्वोच्च स्तरावर काम करणारा अधिकारी जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावू शकतो,” अशा आशयाचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी राजकीय इच्छाशक्तीसोबत प्रशासकीय समन्वयाची आवश्यकता असल्याचे सांगत विद्याधर महाले यांच्या कर्तृत्वामुळे जिल्ह्याला भविष्यात विविध क्षेत्रांत फायदा होण्याची अपेक्षा आमदार श्री धीरज लिंगाडे यांनी व्यक्त केली.
‘बुलढाण्यात कचरा झाला, तो उडत उडत चिखलीत आला’
त्यानंतर आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी आपल्या भाषणातून सामाजिक उपक्रमांसोबतच बुलढाण्यातील राजकीय परिस्थितीवर थेट भाष्य केले. “बुलढाण्यात खूप कचरा झाला आणि तो उडत उडत चिखलीत आला,” या त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.
राजकारणात संयम महत्त्वाचा असला तरी शांत राहणाऱ्याला कमजोर समजण्याची प्रवृत्ती योग्य नसल्याचे सांगत त्यांनी अन्यायाला वाचा फोडण्याची भूमिका स्पष्ट केली. “संस्काराची शिदोरी घेऊन आम्ही समाजकारणात आलो आहोत. राजकारण हे दुय्यम आहे; मात्र अन्याय होत असेल तर त्याविरोधात आवाज उठविणेही गरजेचे आहे,” असा सूर त्यांच्या भाषणातून उमटला.
सहकार क्षेत्रातील निवडणुकीदरम्यान युतीधर्म पाळून सहकार्य केल्यानंतरही चिखलीत येऊन विरोधाचे राजकारण केले जात असल्याचा संदर्भ देत त्यांनी अशा प्रकारचे राजकारण खपवून घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
“बुलढाण्याच्या सेवेचे व्रत आम्ही आजपासून स्वीकारत आहोत आणि त्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही,” असे सांगत त्यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी आपली भूमिका स्पष्ट केली.
‘राजकारणात येऊ नका; पुढच्या वर्षी IAS व्हा!’
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांनी आपल्या भाषणात विद्याधर महाले यांना मात्र आगळावेगळा आणि प्रेमळ सल्ला दिला. “तुम्ही राजकारणात येऊच नका. राजकारण खूपच घाण आहे,” असे सांगत त्यांनी मिश्कील शैलीत, “पुढच्या वर्षी तुम्ही IAS व्हा; म्हणजे यापेक्षा दहापट मोठा सत्कार मी स्वतः घडवून आणतो,” असे उद्गार काढले.
त्याचवेळी आमदार श्वेताताई महाले यांनाही त्यांनी अधिक विधायक आणि विकासाभिमुख कामांकडे लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. “उगाच कचऱ्याच्या नादी लागू नका,” असा प्रेमळ टोला लगावत त्यांनी राजकीय वादांपेक्षा विकासकामांना अधिक महत्त्व देण्याचे आवाहन केले.
बुलढाणा शहर झपाट्याने विकसित होत असून आर्थिकदृष्ट्याही शहर स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत असल्याचे चांडक यांनी नमूद केले. बुलढाण्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची क्षमता शहरात आहे; मात्र राजकीय परिस्थिती सुधारण्याची गरज आहे. राजकीय वातावरण सकारात्मक झाले तर आर्थिक विकास आपोआप वेगाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राधेश्याम चांडक यांनी आपल्या भाषणात देशाचा कारभार प्रत्यक्षात राजकीय व्यक्तींपेक्षा नोकरशहांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर चालतो, अशा आशयाची मिश्कील टिप्पणी केली. त्याला उत्तर देताना विद्याधर महाले यांनी प्रशासन आणि राजकीय नेतृत्व यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.
“अधिकाऱ्यांना पारदर्शकपणे आणि निर्भीडपणे काम करण्याचे स्वातंत्र्य नेतृत्वाकडून मिळाले, तर प्रशासन अधिक प्रभावीपणे काम करू शकते,” असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना विश्वासाने काम करण्याचे वातावरण दिल्यामुळे प्रशासनातील अधिकारी अनेक कठीण निर्णयही निर्भीडपणे घेऊ शकत असल्याचे त्यांनी नमूद केले. तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी आज निर्भयपणे काम करत असल्याचे उदाहरण देत त्यांनी यामागे सक्षम राजकीय नेतृत्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट केले.
‘विदर्भाचा सुपुत्र मुख्यमंत्रीपदी असल्याचा फायदा विदर्भाला’
आपल्या भाषणात विद्याधर महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विदर्भाच्या विकासाला मिळालेल्या गतीचाही उल्लेख केला. “विदर्भाचा सुपुत्र मुख्यमंत्रीपदी बसला आहे. त्यामुळे विदर्भाच्या विकासाला मोठी गती मिळत आहे,” असे ते म्हणाले.
राज्य सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख करत त्यांनी शेतकरी, महिला, युवक आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणावर जनतेपर्यंत पोहोचत असल्याचे सांगितले. विकासाच्या प्रक्रियेत प्रशासन, राजकीय नेतृत्व आणि समाज यांचा समन्वय महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आपल्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यातील मित्रमंडळींनी आयोजित केलेल्या भव्य सोहळ्याबद्दल त्यांनी मनापासून आभार मानले. आमदार श्वेताताई महाले आणि राधेश्याम चांडक यांनी मांडलेल्या विविध भूमिकांमध्ये समतोल साधत त्यांनी वाढदिवसाचा सोहळा हा व्यक्तिगत गौरवापेक्षा समाज आणि जिल्ह्यासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची संधी असल्याचे अधोरेखित केले.
बुलढाण्याच्या विकासासाठी राजकीय वातावरण सकारात्मक असावे, प्रशासनाला निर्भीडपणे काम करण्याचे स्वातंत्र्य मिळावे आणि सामाजिक बांधिलकीतून आरोग्य व शिक्षणाला बळ मिळावे, असा एकत्रित संदेश या अभिष्टचिंतन सोहळ्यातून पुढे आला...
Tags
खबरबात स्पेशल
