Khabarbat News- *सोनेवाडी नगरी झाली शिवमय! युवानेते मृत्युंजय गायकवाड यांनी घेतले ओलांडेश्वराचे दर्शन, महाआरतीने वातावरण भक्तिमय*

 




सोनेवाडी | दि. २४ ऑगस्ट २०२६

चिखली विधानसभा मतदारसंघातील ग्राम सोनेवाडी येथे मर्दडी माता ते सोनेवाडी अशी श्री ओलांडेश्वर भव्य कावड यात्रा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कावड यात्रेचे सोनेवाडी येथे आगमन झाल्यानंतर बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री. संजुभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र तथा बुलढाणा नगरपालिकेचे गटनेते युवानेते श्री. मृत्युंजय संजय गायकवाड यांनी कावडीचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या हस्ते श्री ओलांडेश्वराची मनोभावे महाआरती संपन्न झाली. महाआरतीच्या वेळी उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने सहभाग घेत ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’ च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला. श्रावण सोमवारच्या पावन पर्वावर आयोजित करण्यात आलेल्या या कावड यात्रेमुळे सोनेवाडी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

कावड यात्रेच्या निमित्ताने युवानेते मृत्युंजय गायकवाड यांनी उपस्थित गावकऱ्यांशी तसेच युवकांशी मनमोकळा संवाद साधला. गावातील विविध विषयांबाबत नागरिकांकडून माहिती घेत त्यांनी युवकांच्या सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे कौतुक केले. श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकोप्याच्या माध्यमातून गावागावांत सकारात्मक वातावरण निर्माण करणाऱ्या युवकांच्या उपक्रमांना सदैव प्रोत्साहन देणार, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

मर्दडी माता ते सोनेवाडी या मार्गावरून मोठ्या उत्साहात कावड यात्रा काढण्यात आली. पारंपरिक व भक्तिमय वातावरणात कावडधारी युवकांनी सहभाग नोंदविला. हातात भगवे ध्वज, मुखी महादेवाचे नामस्मरण आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. सोनेवाडी येथे यात्रेचे आगमन होताच ग्रामस्थांनी कावडधारींचे उत्साहात स्वागत केले.

युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांनी कावड यात्रेचे दर्शन घेत महादेवाच्या चरणी नतमस्तक होत सर्व भाविकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. तसेच श्री ओलांडेश्वर कावड यात्रा आयोजित करणाऱ्या सर्व आयोजक युवकांचे आणि सहभागी कावडधारींचे अभिनंदन केले.

या प्रसंगी शिवदूत तालुकाप्रमुख श्री. नितीन राजपूत, श्री. गणेश यंगड, श्री. दीपक तुपकर, श्री. पिंटू गायकवाड, श्री. अभिषेक वीर, श्री. विलास भवर, श्री. सतीश शिरसाठ, ज्ञानेश्वर खांडवे यांच्यासह शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जगदंब प्रतिष्ठानचे पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच श्री ओलांडेश्वर कावड यात्रेतील सर्व कावडधारी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रावण सोमवारचे पावित्र्य, महादेवावरील अढळ श्रद्धा, युवकांचा उत्साह आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे श्री ओलांडेश्वर भव्य कावड यात्रा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. 

Previous Post Next Post