यानंतर असा प्रकार घडल्यास तहसीलदारांची खुर्ची थेट कार्यालयाबाहेर लटकवणार;
मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडेंचा गंभीर इशारा
चिखली:
शेलगाव जहांगीर येथील शेतकऱ्यांच्या शेत रस्त्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मागील दोन दिवसांपासून शेतकरी बांधव तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. दिनांक १० जून २०२६ रोजी शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी निवडणुकीच्या कामकाजाचे कारण पुढे करत काढता पाय घेतला. त्यानंतर आज दिनांक ११ जून २०२६ रोजी पुन्हा शेतकरी सकाळी ११:०० वाजल्यापासून तहसील कार्यालयात ठाण मांडून बसले होते. मात्र, कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी किंवा तहसीलदार उपस्थित नसल्याने संपूर्ण कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला.
तासनतास ताटकळत बसलेल्या त्रस्त शेतकऱ्यांनी अखेर या अन्यायाची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्या कानावर घातली. माहिती मिळताच जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी तात्काळ आपल्या पदाधिकाऱ्यांसह तहसील कार्यालय गाठले. त्यांनीही सुमारे एक तास तहसीलदारांची वाट पाहिली. परंतु, कोणीही अधिकारी न आल्याने त्यांनी थेट उपविभागीय अधिकारी यांना संपर्क साधला असता त्यांनीही फोन उचलला नाही. त्यामुळे मनसेचे पदाधिकारी थेट कार्यालयात ठिय्या मांडून बसल्याचे समजताच प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आणि अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि काही क्षणांत महसूल सहाय्यक हे कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी बरबडे यांनी सांगितले की, तहसील कार्यालयामध्ये अधिकारी उपस्थित नसण्याची बाब नेहमीची आहे. मात्र या नंतर पुन्हा असा प्रकार घडल्यास तहसीलदारांची खुर्ची थेट कार्यालयाच्या बाहेर लटकवण्यात येईल. असा इशारा यावेळी देण्यात आला. त्यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, शिवा ठेंग यांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
खबरबात स्पेशल
