नदीपात्राची तातडीने स्वच्छता करण्याची शिवाजी शिराळे यांची मागणी
चिखली, प्रतिनिधी :
शहरातून वाहणाऱ्या जामवंती नदीच्या पात्रामध्ये साचलेल्या घाण पाण्यामुळे शेलूद परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नदीपात्रातील दूषित पाण्यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला असून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
नदी परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. पावसाळा जवळ आल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शिवाजी शिराळे यांनी चिखली नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून जामवंती नदीपात्राची तातडीने स्वच्छता करण्याची मागणी केली आहे. तसेच नदीत सोडले जाणारे सांडपाणी रोखणे, नियमित डास प्रतिबंधक फवारणी करणे आणि नदीपात्रातील गाळ व घाण काढून पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शेलुद परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
