Khabarbat News-निळ्या आभाळाखाली उसळला निळाईचा सागर ; समता, न्याय अन् बंधुत्वाचा उत्सव!

 



चिखलीत निनादला महामानवाच्या जयंतीचा जल्लोष


चिखली/(प्रतिनिधी )- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव आणि कोट्यावधींचे प्रेरणास्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त काल मंगळवार, १४ एप्रिल रोजी शहरात समता, न्याय आणि बंधुत्वाचा अभूतपूर्व जल्लोष पाहायला मिळाला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा महामानवांनी दिलेला संदेश घेऊन संपूर्ण शहर निळ्या रंगात न्हाऊन निघाले होते.

सायंकाळी वाड्या-वस्त्यांमधून निघालेल्या मिरवणुकांमध्ये आबालवृद्धांचा मोठा सहभाग होता. फटाक्यांची आतषबाजी, लेझर शो, डीजेच्या दणदणाटावर थिरकणारी तरुणाई, ढोल-ताशांचा गजर आणि ‘जयभीम’च्या गगनभेदी घोषणा यामुळे संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. जयस्तंभ चौक परिसरात रात्री उशिरापर्यंत प्रचंड गर्दी झाली होती.

मिरवणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच गौतम बुद्ध यांच्या प्रेरणादायी मूर्ती आणि देखावे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. सायंकाळी ५ वाजल्यापासून विविध भागांतून ‘जयभीम’च्या घोषणांनी आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणुकांना प्रारंभ झाला. त्यानंतर रात्री ९ वाजल्यानंतर मुख्य जयस्तंभ चौकात विविध मंडळांचा सहभाग वाढला आणि परिसर निळ्या जनसागराने फुलून गेला.

‘निळ्या आभाळाखाली उसळला निळाईचा सागर, समता, न्याय अन् बंधुत्वाचा उत्सव’ अशा संकल्पनांवर आधारित सादरीकरणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सम्राट अशोक, फुले-आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्या वतीने ९ एप्रिलपासून १४ एप्रिलपर्यंत विविध स्पर्धा, व्याख्याने, भीमगीतांचा ऑर्केस्ट्रा आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

समितीचे अध्यक्ष विशाल खरात यांच्या संकल्पनेतून ‘सत्यशोधक महात्मा फुले आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान आपल्या हातात सुपूर्द करून संविधान रुजविण्याची जबाबदारी आपलीच आहे’ या संदेशावर आधारित सेल्फी फ्रेम हे मुख्य आकर्षण ठरले.

सकाळी ९ वाजता शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. यानंतर दिवसभर विविध कार्यक्रमांनी जयंती उत्सवाला रंगत आणली. रात्रीच्या मिरवणुकीत भाजप , काँग्रेस, शिवसेना शिंदे -राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट , महाकाल मित्र मंडळ, उत्सव समिती तसेच विविध सामाजिक संघटनांनी स्वागत मंच उभारून मिरवणुकांचे पुष्पवृष्टीने स्वागत केले.

भिमक्रांती नगर, भिमज्योती नगर, गजानन नगर, पुंडलिक नगर, शाहूनगर, भीमनगर, सिद्धार्थ नगर, शेलूद, चैतन्य नगर, संभाजीनगर, एकता नगर, लुंबीनी नगरआणि नागसेन बुद्ध विहार आदी भागांतून स्वतंत्र मिरवणुका काढण्यात आल्या. कुणी नाय केल भलं माय, भीमानं केलं दिल्लीच दालन खुलं माय भीमानं केलं, ‘महया भीमानं सोन्यानं भरली ओटी’, व्हीआयपी राहण, व्हिआयपी खान अश्या असंख्य भिम डीजे रिमिक्स या गीतावर तरुणाईने जल्लोषात नृत्य केले.

अनुचित प्रकार टाळण्यासाठी चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच चिखली नगर पालिका प्रशासन, महावितरण विभाग यांची देखील मोलांची कामगिरी राहिली. अनेक मंडळांनी अन्नदान, सरबत, खीर आणि पिण्याच्या पाण्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.

रात्री उशिरापर्यंत जयभीमच्या घोषणांनी शहर दुमदुमत राहिले. मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर ठाणेदार भूषण गावंडे यांच्या वाढदिवसानिमित्त समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

Previous Post Next Post