अपघातांचा धोका वाढल्याचा गंभीर आरोप
नितीन फुलझाडे
चिखली | जि. बुलढाणा
चिखली शहरातील मुख्य रस्त्यांवरील डिव्हायडरवर अनधिकृतपणे लावण्यात येणाऱ्या बॅनरप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते राजेंद्र सर्जेराव लहाने माहिती अधिकार प्रचारक बुलढाणा यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते तसेच काही नागरिकांकडून डिव्हायडरवर मोठमोठे बॅनर लावले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापैकी अनेक बॅनर प्रशासनाच्या परवानगीशिवाय उभारले जात असून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
विशेषतः वळणाच्या ठिकाणी आणि चौकांमध्ये लावलेले बॅनर वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. समोरून येणारी वाहने किंवा पादचारी दिसत नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. नागरिकांनीही या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, काही बॅनर नगरपालिका प्रशासनाच्या परवानगीने लावले जात असले तरी अनेक ठिकाणी अनधिकृत फलकांमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत.
प्रशासनाला ठोस कारवाईचे आवाहन
तक्रारदार राजेंद्र लहाने माहिती अधिकार प्रचारक बुलढाणा यांनी मागणी केली आहे की –
१)सर्व अनधिकृत बॅनर त्वरित हटवण्यात यावेत.
२)भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर नियम लागू करावेत.
३)जबाबदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
या तक्रारीनंतर नगरपालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून ठोस निर्णयाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
