Khabarbat News- 70 किलो प्लास्टिकचा साठा जप्त



मनपा पथकाची कारवाई
नितीन फुलझाडे 
चंद्रपूर 10 मार्च – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकविरोधात कारवाई सुरू असून उपद्रव शोध (NDS) पथकाद्वारे गोल बाजार परिसरातील दुकानातून एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
  मंगळवार 10 मार्च रोजी दुपारी सुमारे 3 वाजता गोल बाजार येथील कोमल ट्रेडर्स या दुकानाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान दुकानात 3 पोत्यांमध्ये अंदाजे 70 किलो एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकचा साठा आढळून आला. शासन निर्णयानुसार अशा प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी असल्यामुळे सदर साठा जागेवर जप्त करण्यात आला. तसेच संबंधित दुकान मालकाकडून 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली.
  बंदी असलेल्या एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकवर प्रभावी कारवाई करण्यासाठी आयुक्त अकुनुरी नरेश यांच्या निर्देशानुसार मनपातर्फे 8 विशेष पथके तयार करण्यात आली असून या पथकांकडून शहरात नियमित तपासणी व कारवाई करण्यात येत आहे. यावेळीही या दुकानासंदर्भात मनपाला गुप्त माहिती प्राप्त झाली होती.
  एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकचा साठा अथवा बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांबाबत माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येत असून दिलेली माहिती खरी ठरल्यास 5 हजार रुपयांचे बक्षीस देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक सुजाण नागरिकांकडून अशा अवैध साठ्यांबाबत तक्रारी मनपाला प्राप्त होत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
  ही कारवाई सहाय्यक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शेळके, प्रभारी स्वच्छता निरीक्षक तथा पथक प्रमुख शुभम खोटे, शुभम चिंचेकर व राहुल गगपल्लिवार यांनी केली. शहरात एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी मनपाकडून अशी कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Previous Post Next Post