नितीन फुलझाडे
चिखली : माऊली नगर (राऊतवाडी) येथील ब्रह्हांडनायक श्री संत गजानन महाराज मंदिरात संत गजानन महाराजांचा प्रकटदिन भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रकटदिनानिमित्त छोट्या पोथीचे पारायण करण्यात आले. यावेळी सौ. पुष्पाताई सुरडकर यांनी प्रवचन देत भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले. दिवसभर परिसरात नामस्मरणाचा गजर सुरू होता, त्यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते.
सायंकाळी महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हजारो भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेत प्रकटदिनाचा उत्सव उत्साहात साजरा केला. संपूर्ण परिसरात श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
दरम्यान, मंदिरात दर गुरुवारी सायंकाळी आरतीनंतर महाप्रसाद वितरणाचा नियमित उपक्रम राबविण्यात येत आहे. वर्षभरातील अंदाजे ५३ गुरुवारांच्या अन्नदानासाठी मंदिर विश्वस्तांनी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सुमारे ४५ गुरुवारांसाठी महाप्रसादाची जबाबदारी भाविकांनी स्वेच्छेने स्वीकारली आहे.
सद्यस्थितीत उर्वरित गुरुवारांसाठी इच्छुक भाविकांनी पुढे येऊन महाप्रसादाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन मंदिर विश्वस्तांनी केले आहे. दर गुरुवारी होणारा हा उपक्रम परिसरातील श्रद्धाळूंमध्ये आध्यात्मिक एकात्मता आणि सेवाभाव अधिक दृढ करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
