महिलांची दुचाकी रॅली,रक्तदान शिबिर व बाल वेशभूषा ठरणार विशेष आकर्षण
नितीन फुलझाडे
चिखली:- येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात शिवभक्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने यंदाचा शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.१९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या सोहळ्यात धार्मिक विधींसोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार पाहायला मिळणार असल्याची माहिती उत्सव समितीने दिली आहे.आज १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता शिवरायांचा अभिषेक व पूजन पार पडेल. त्यानंतर ९.३० वाजता प्रसाद वितरण करण्यात येईल. सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत शिवरायांना मानाची वंदना दिली जाणार आहे.
सकाळी १०.३० वाजता महिलांची दुचाकी रॅली निघणार आहे. उत्सवाचे औचित्य साधून सकाळी १०.३० ते दुपारी २.०० या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, लहान मुलांमध्ये शिवरायांचे विचार रुजवण्यासाठी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज उत्कृष्ट वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता सामूहिक महाआरती संपन्न होईल. यावर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे भव्य लाईट शो आणि डीजे साऊंड असणार आहे. अत्याधुनिक प्रकाश झोतात आणि शिवगर्जनांच्या निनादात हा सोहळा चिखलीकरांसाठी पर्वणी ठरणार आहे. या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवभक्त शिवजयंती उत्सव समिती, चिखली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
