Khabarbat News- पाटोदा येथे एसटी बस-मोटरसायकल अपघात; एक जण जबर जखमी....




नितीन फुलझाडे 

 पाटोदा येथे एसटी बसचा कहर; बाहेर निघालेल्या पत्र्यामुळे मोटरसायकल अपघात, एक जण जबर जखमी...

पाटोदा (चिखली) – चिखली तालुक्यातील पाटोदा गावात आज सकाळी एसटी बस आणि मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जबर जखमी झाला असून, एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. एसटी बसचा पत्रा बाहेर निघाल्याने हा अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

आज सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पाटोदा येथे ही घटना घडली. चिखली आगाराची पेन सावंगी – चिखली ही नियमित धावणारी एसटी बस पाटोदा गावातून जात असताना रस्त्यावरून जाणाऱ्या मोटरसायकलला धडकली. ही घटना गावातील अरुंद रस्त्यावर आणि वळण असलेल्या ठिकाणी घडली.

या अपघातात भास्कर विष्णू खंदारे (वय ६५) हे जबर जखमी झाले असून, मोटरसायकल चालवत असलेले भिकाजी काकफळे (वय ३५) यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित एसटी बस फार वेगाने असल्याचे सांगण्यात येत आहे. गावाचा रस्ता लहान व अरुंद असतानाही बस वेगात चालवली जात होती. अपघाताच्या ठिकाणी वळण असून, बसच्या बाजूला सुमारे १२ इंचाचा लोखंडी पत्रा बाहेर निघालेला होता. हाच पत्रा मोटरसायकलवरील मागे बसलेल्या भास्कर खंदारे यांच्या अंगाला लागल्याने ते गंभीर जखमी झाले आणि अपघात घडला.

          एसटी बसची अवस्था पाहता ती अनफिट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अशा स्थितीत असलेली गाडी रस्त्यावर धावत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचे संतप्त ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संबंधित बसची तात्काळ तपासणी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.



"◼️*बस अनफिट नव्हती, चिखली डेपो मधून तसेच एकलारा भोर्शी येथूनही बस जाताना व येताना कोणत्याही प्रकारचा पत्रा वगैरे बाहेर निघालेला नव्हता याची शहानिशा सीसीटीव्ही कॅमेराद्वारे ही केल्या जाऊ शकते. तसेच चिखली डेपो मधून एसटी बस निघताना तीन चार कॅमेऱ्यातून चेक होऊनच पुढे जाते*"

◼️"*पाटोदा फाट्याच्या कमानीपासून आत जाणाऱ्या वळणावर हा अपघात झाला होता. घटनास्थळी पाहणी केली असता तसेच ड्रायव्हर,कंडक्टर यांनाही विचारणा केली असता अपघातग्रस्त मोटरसायकलचे हँडल हे बसच्या चालक साईडला घासत जाऊन तिथे पत्र्यात घासले त्यामुळे पत्रा बाहेर निघाला*"

*(संतोष जोगदंडे- डेपो मॅनेजर, चिखली)*




◼️*अपघातग्रस्तांनी दिलेली माहिती अत्यंत चुकीची आहे.वाहनातील प्रवासी तसेच गावातील मंडळींनी देखील सदरील इसमांना त्यांची चुकी लक्षात आणून दिली होती.तसेच निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे आतापर्यंत त्यांचा हा तिसऱ्यांदा चौथ्यांदा अपघात आहे व त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे वाहन चालवण्याचे लायसनही नसल्याचे एसटी बस ड्रायव्हर कंडक्टर यांनी खबरबात न्यूज सोबत बोलतांना सांगितले*


Previous Post Next Post