Khabarbat News- टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरॅथॉनमध्ये चिखली व बुलढाणाकरांची दणदणीत मुसंडी

 


नितीन फुलझाडे
चिखली:- रविवारी दिनांक 18 जानेवारी रोजी पार पडलेल्या जगप्रसिद्ध टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरॅथॉनमध्ये चिखली व बुलढाणा येथील धावपटूंनी आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी करत चिखलीचे नाव देश-विदेशात उज्वल केले. या भव्य आंतरराष्ट्रीय क्रीडा महोत्सवात भारतासह विविध देशांतील सुमारे 40 ते 50 हजार धावपटूंनी सहभाग नोंदविला होता. मोठ्या प्रमाणावर असलेल्या या सहभागामुळे ही मॅरॅथॉन केवळ स्पर्धा न राहता आरोग्य, एकता आणि क्रीडाभावनेचा उत्सव ठरली.

          या स्पर्धेत चिखली येथील महेश महाजन, विष्णू सोळंकी , संतोष जाधव, अजबराव आखरे, डॉ. विजय वाघ, डॉ. संदीप पऱ्हाड, डॉ. उमेश जाधव, डॉ. संतोष नागोलकर, स्वप्निल काळवाघे, योगेश शर्मा, समाधान आराख, भारत सिंग राजपूत यांनी 42.195 किलोमीटरची फुल मॅरॅथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करत अपार सहनशक्ती आणि मानसिक बळाचे दर्शन घडविले. तर नंदकिशोर पिसे पाटील, अनिल काळे मामा, अनिल गाडे, कैलास ठेंग, डॉ. योगेश शेवाळे, डॉ. गजेंद्र निकम, डॉ. दिपक काटकर,  डॉ. चैतन्य जाधव, सरदार सिंह ठाकूर, विवेक सुरुशे रणजित व्यवहारे व महिला मधून प्रियांका सुरूशे यांनी हाफ मॅरॅथॉनमध्ये सहभाग घेत वेळेत धाव पूर्ण केली. याशिवाय दीपक कदम, रमेश काळे व वर्षा लहासे हिवाळे यांनी 10 किलोमीटर धाव यशस्वीरीत्या पूर्ण करून पदक मिळविले. सर्व धावपटूंनी ठरलेल्या वेळेत शर्यत पूर्ण करून चिखलीकरांच्या कर्तृत्वावर मोहोर उमटवली.

       या मॅरॅथॉनचा रूटही अत्यंत आकर्षक व नियोजनबद्ध होता. माहीम रेती बंदर येथून सुरू झालेली शर्यत कोस्टल रोड, बांद्रा-वर्ली सी लिंक, पेडर रोड, गिरगाव चौपाटी असा नयनरम्य समुद्रकिनाऱ्यालगतचा प्रवास करत अखेर ऐतिहासिक आझाद मैदानात संपन्न झाली. समुद्राची थंड हवा, प्रेक्षकांचा उत्साह आणि स्वयंसेवकांचे प्रोत्साहन यामुळे धावपटूंना प्रत्येक टप्प्यावर नवी ऊर्जा मिळत होती.

      या भव्य स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी टाटा मुंबई मॅरॅथॉनच्या आयोजकांचे शिस्तबद्ध व काटेकोर नियोजन विशेष उल्लेखनीय ठरले. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासन, स्वयंसेवक, वैद्यकीय पथके, पाणी व ऊर्जा पुरवठा केंद्रे, वाहतूक व्यवस्थापन तसेच मार्गदर्शन फलक यांची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे हजारो धावपटूंना कोणताही अडथळा न येता सुरक्षितपणे शर्यत पूर्ण करता आली.

       चिखली व बुलढाणा येथील धावपटूंनी सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि आरोग्याविषयीची जागरूकता याच्या बळावर ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यांच्या या यशामुळे बुलढाणा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, युवकांना क्रीडा व आरोग्य क्षेत्रात पुढे येण्यासाठी ही कामगिरी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
Previous Post Next Post