Khabarbat News- आ. सौ. श्वेता महाले यांच्याकडून चिखली शहराच्या विकासासाठी सर्वपक्षीय सहकार्याचे आवाहन...

 





चिखलीत “संवाद सलोख्याचा” : विकासासाठी सर्वपक्षीय हातमिळवणीचा संदेश..

            

           चिखली:-निवडणुका या लोकशाहीचा आत्मा असतात. परंतु या निवडणुका लढताना वेगळे विचार, वेगळी विचारधारा या आधारावर तयार झालेले पक्ष व पक्ष विरहित नागरिक आपल्याला योग्य वाटतात त्या विचारसरणीचा प्रचार, प्रसार करतात तर निवडणूक जिंकण्यासाठी आपल्यापेक्षा वेगळ्या विचारधारेवर,आणी वेगळ्या विचारांच्या व्यक्तींवर निवडणुकीदरम्यान, प्रचारादरम्यान टीकासुद्धा केली जाते.परंतु वेगळी विचारधारा आहे म्हणून 'भारतीय' असलेल्या कोणत्याही व्यक्तीचे, 'व्यक्ती' व एक भारतीय नागरिक म्हणून असलेले मूल्य कमी होत नाही. 


हाच विचार घेऊन नुकत्याच पार पडलेल्या चिखली नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक म्हणून जे लोकप्रतिनिधी निवडून येतील, त्यांच्याकडे कोणत्याही पक्षाच्या, कोणत्याही विचाराच्या व कोणत्याही विचारधारेच्या चिखली शहरातील नागरिक असलेल्या व्यक्तीला आपले काम घेऊन जाताना ओशाळवाने वाटू नये, याकरिता चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेता महाले पाटील यांच्यातर्फे सर्वपक्षीय व्यक्तींसाठी "संवाद सलोख्याचा" हा सर्वांमध्ये असलेला सलोखा जपण्यासाठी विशेष संवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता.


प्रचारादरम्यान निर्माण झालेली कटुता विसरून चिखली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी केले. चिखलीतील मीरा सेलिब्रेशन, जालना रोड येथे त्यांच्या पुढाकाराने “संवाद सलोख्याचा” हा सर्वपक्षीय कार्यक्रम संपन्न झाला.


नुकत्याच पार पडलेल्या चिखली नगरपरिषद निवडणुकीनंतर भविष्यातील कार्यात राजकारण व पक्षीय मतभेद आड येऊ नये, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गवासी माजी मंत्री स्व. भारतभाऊ बोन्द्रे, काँग्रेस पदाधिकारी स्व.सत्येंद्र भुसारी व भाजपाचे जिल्हा सरचिटणीस स्व.पंजाबराव धनवे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


आपल्या भाषणात आमदार सौ. श्वेता महाले म्हणाल्या की,“निवडणूक संपल्यानंतर लोकप्रतिनिधी हा संपूर्ण मतदारसंघाचा असतो. आपण कोणत्याही पक्षाचे असलात तरी चिखलीच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य केले पाहिजे. नागरिकांचे काम करताना आगामी नगराध्यक्ष, नगरसेवक यांना कोणताही ओशाळवाणेपणा वाटू नये. विकासाच्या आड राजकारण येऊ देऊ नका.” या कार्यक्रमातून सौहार्द, सहकार्य आणि सर्वसमावेशक विकासाचा संदेश देत चिखली शहर एकदिलाने पुढे नेण्याचा निर्धार आ. सौ. श्वेता महाले यांनी व्यक्त केला.


यावेळी डॉ. प्रतापसिंह राजपूत, श्री पंडितदादा देशमुख, प्रकाश महाराज जवंजाळ, रामकृष्ण दादा शेटे, संतोष काळे पाटील, डॉ. कृष्णकुमार सपकाळ, विलास घोलप, संजय गाडेकर, एकनाथ जाधव, दीपक खरात, विष्णू मेथे, दीपक वाधवानी, ओमसिंग मोरे, सुरेंद्रजी पांडे, प्रकाश बाहेती, नईम सौदागर, अमोल खबुतरे, रफिक सेठ यांच्यासह विविध पक्षांचे मान्यवर उपस्थित होते...

Previous Post Next Post